नवी दिल्ली – किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमती अचानक वाढल्यामुळे केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवरील नियम शिथिल करण्याचे जाहीर केले आहे. यासह सरकारने शिलकी साठा (बफर स्टॉक) मधून कांदा बाजारात उपलब्ध करून देण्याचीही तयारी करत आहे. त्यामुळे सण-उत्सवाच्या हंगामात कांद्या ग्राहकांना योग्य किंमतीत उपलब्धता करता येईल, असे नियोजन केंद्र सरकारने केले आहे.
गेल्या दहा दिवसांत कांद्याच्या भावात 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्व भारतीय उच्चायोगांना संबंधित कांदा उत्पादक देशातील व्यापाऱ्यांशी या संदर्भात संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच अधिकाधिक कांदा देशात आयात होऊ शकेल. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कांदा आयात करण्याच्या नियमात ही सवलत दि. 15 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यासह, सरकारने बफर स्टॉकमधून सर्व राज्यापर्यंत कांदे पोहचविले जात आहेत. त्या स्टॉकमध्ये आणखी वाढ करण्यात येईल.
दरम्यान, ग्राहक मंत्रालयाचे म्हणणे आहे की, गेल्या दहा दिवसांत कांद्याचे दर वाढले आहेत. कांद्याचे दर प्रति किलो ७० ते ९० रुपये झाले आहेत. या कालावधीत मागील वर्षीच्या किंमतीपेक्षा ही 12 टक्क्यांनी जास्त आहे. कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यात निर्यातीवरील बंदीचा समावेश आहे. कांद्याचे दर अचानक वाढल्याची अनेक कारणे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यापैकी महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस हे देखील एक प्रमुख कारण आहे. कारण, पावसामुळे खरीप पीक खराब झाले होते. यासह कांद्याच्या साठ्याचेही नुकसान झाले आहे.