पिंपळनेर (ता. साक्री) – कांदा लिलाव सकाळी १० वाजता सुरू करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने पिंपळनेर उपबाजार समिती प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनास एन्ट्री पास देण्यात यावा. शेतमाल विक्रीचे पेमेंट रोख अथवा धनादेश स्वरूपात आणि त्याच तारखेचा धनादेश देण्यात यावा. बाजार समितीच्या हिशोब पट्टीची पक्की पावती देण्यात यावी. बाजार समितीमार्फत लिलाव करण्यासाठी योग्य जागा निश्चित करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी चिकसे येथील उपसरपंच संजय जगताप, शिववाहतूक सेनेचे ज्ञानेश्वर पगारे, डॉ.भूषण एखंडे आदी शेतकरी उपस्थित होते.