चांदवड- राहुड येथील दीपक राजेंद्र निकम यांच्या पाडगण मळा येथील शेतात लावलेल्या कांदा रोपावर कुणी अज्ञात इसमाने तणनाशक फवारले. सद्या सगळीकडे लाल कांद्याची लागण सुरू असून कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव आला आहे.सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची रोपे खराब झाली आहेत.निकम यांच्या ऐन मौसमात लावणीला आलेल्या रोपावर कुणी तरी अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास तणनाशक मारल्यामुळे निकम यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रोप पिवळे पडू लागल्यावर निकम यांच्या ही बाब लक्षात आली. निकम यांनी पंधरा किलो बियाणे विकत घेऊन रोप तयार केले होते. आधीचे २० किलोचे रोप पावसाने व रोगट वातावरणामुळे खराब झाले होते. दीपक निकम यांचे अंदाजे दोन लाख रुपयांचे त्यांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर तीन एकर शेत सहा महिने रिकामे ठेवण्याची वेळ आली आहे.
सदर घटनेची प्रशासनाने त्वरित चौकशी करून या घटनेचा पंचनामा करावा व निकम यांना झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.