देवळा – ग्रामीण भागात अपप्रवृत्तींचा संचार होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. तालुक्यातील माळवाडी येथील शेतकरी संतोष मन्साराम बागुल यांच्या शेतात कांदा बियाण्याच्या रोपावर अज्ञात समाजकंटकांनी ग्लायसोफेट किंवा मीरा ७१ सारखे घातक तणनाशक फवारल्याची बाब निदर्शनास आली आहे. यामुळे बागुल यांच्या १५ आर क्षेत्रावरील ६ पायली कांदा बियाणे नष्ट झाले आहे. अतिशय महागडे बियाणे खरेदी करुन त्यांनी लागवड केली होती. त्यामुळे बागुल यांना मोठे नुकसान सहन करावा लागत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बागुल यांनी केली आहे. तसेच, शेतात गवताचेही बी टाकण्यात आल्याचा दावाही बागुल यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गाव परिसरात अतिशय संतापाचे वातावरण असून अशा प्रकारांना लगान घालण्याची मागणी होत आहे.