निलेश गौतम, डांगसौंदाणे, ता. सटाणा
नेहमी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा यंदा लागवडी वेळीच शेतकऱ्यांची परीक्षा पाहत आहे. यंदा कांदा बियाण्यांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. गतवर्षी वातावरणातील सततच्या बदलामुळे कांद्याच्या बियाण्यांसाठी लावलेले डेंगळे खराब झाले. त्यामुळे बियाण्यांचे उत्पादन प्रचंड घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खाजगी बियाणे उत्पादकांचे बियाणे खरेदी करण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळेच कांदा बियाण्यांच्या दरात तब्बल तीनपट वाढ झाली आहे. दरवर्षी १४०० ते १५०० रुपयांना मिळणारे कांदा बियाणे सध्या ३५०० ते ४००० रुपयांना विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.
व्याजाचे पैसे काढून खरेदी
गेल्या वर्षी कांद्याला मिळालेला इतिहासातील उच्चांकी दर आणि यामुळे डेंगळ्यांची लागवड कमी झाली. त्यातच जे लावलेत ते वातावरणामुळे खराब झाल्याने या वर्षी कधी नव्हे इतका कांदा बियाणेचा तुटवाडा निर्माण झाला आहे. कांदा बियाणे निर्मिती करणाऱ्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बागबानी संशोधन केंद्र (NHRDF) चितेगाव, निफाड च्या माध्यमातून रेड-३ रेड-४ या वाणाची उपलब्धता होते. जिल्ह्यातील अधिकृत विक्रेत्यांच्या माध्यमातून व लासलगाव, चितेगाव, सिन्नरच्या केंद्रावर २३०० रूपये प्रति किलो दराने विक्री करण्यात आली. प्रचंड मागणीमुळे केंद्राचे बियाणे विक्रीचे नियोजन कोलमडले. त्यामुळे शेतकरी आता खासगी कांदा बियाण्यांकडे वळला आहे. खाजगी विविध कंपनीचे बियाणे किलोला साडेतीन ते चार हजार पर्यंत भाव असल्याने शेतकरी प्रसंगी व्याजाचे पैसे काढून बियाणे बुकींग करतांना दिसत आहे.
चालू वर्षी सप्टेंबर मधे कांद्याचे भाव थोडे फार वाढले असले तरी शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडला आहे. त्यामुळे या भाववाढीचा शेतकरी वर्गाला कुठलाही फायदा होणार नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता इतके महागडे बियाणे खरेदी करीत शेतकरी आगामी उन्हाळ कांदा पिकाचे नियोजन करणार आहे. त्यातही बियाण्यांची उगवण क्षमता महत्वाची ठरणार आहे. तसेच, रब्बीसाठी आगामी काळातील वातावरण यावरच पुढील उन्हाळ कांद्याचे नियोजन शेतकरी वर्गाला करावे लागणार आहे.
बियाण्यांची खात्रीच नाही
यंदा कांदा बियाण्यांची मागणी मोठी आहे. शेतकऱ्यांकडे स्वतः घरी बनविलेले बियाणे नाही, त्यामुळे कृषी विक्रेत्यांकडे बियाणे बुकींग सुरू आहे. कुठल्या कंपनीचे किती बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल, याची कुठलीही खात्री नाही. त्यामुळे सध्या कुठल्याही शेतकऱ्याकडून ॲडव्हान्स पैसे घेत नसल्याचे कृषी बियाणे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
—
बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असली तर एकरी ४ ते ५ किलो बियाणे लागते. यावर्षी एकरी बियांण्याचा खर्च २५ ते ३० हजारांवर जाणार आहे. कांदा लागवडीच्या खर्चात यामुळे मोठी वाढ होणार आहे.
– सुधीर सोनवणे, शेतकरी
—
कोरोनाचे संकट असतानाही NHRDF चे बियाणे घेण्यासाठी दिवसभर चितेगावच्या संशोधन केंद्रावर गर्दीत थांबलो. मात्र १०० किमी अंतरावर जाऊन केवळ २ किलो बियाणे मिळाले. बाहेरून ृ३५०० रूपये किलो दराने बियाणे घेण्याची वेळ आली आहे.
– गोंविंद जाधव, शेतकरी