खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश
नाशिक – कांदा, द्राक्षासह अन्य शेतमालाच्या सुरक्षित वाहतुकीसाठी येत्या सात ऑगस्टपासून विशेष कृषी रेल्वे सुरू होणार आहे. यामुळे जिल्हयातील शेतक – यांना अवघ्या काही तासांत राज्यातील व राज्याबाहेरील बाजारपेठ उपलब्ध होणार असून यामुळे शेतक – यांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला होता.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा तसेच द्राक्ष उत्पादन होते. जिल्ह्यातील कांद्याला तर देशभरातून मागणी असते. याबरोबरच नाशिकची द्राक्ष परदेशात निर्यात होतात. उत्पादित शेती मालाच्या विक्रीसाठी जलद व सुरक्षित वाहतुक होणे गरजेचे असल्याने नाशिकला उत्तम, निर्जंतूक तसेच वातानुकूलित बोगींची व्यवस्था असलेल्या कृषी रेल्वेने जोडावे या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या सात ऑगस्ट पासून देवळाली कॅम्प येथून प्रत्यक्ष कृषी रेल्वे सुरू होत आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेच्या विविध योजना तसेच प्रकल्प नाशिकला व्हावेत या विषयी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार आवाज उठविला होता. कांदा आणि द्राक्ष हे नगदी पिके असल्याने या उत्पादनावर शेतक – यांचे आर्थिक गणिते अवलंबून असतात. जिल्ह्यात कांदा, द्राक्ष या बरोबरच भात आणि पालेभाजांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर निघत आहे. उत्पादित मालाची जलद वाहतूक आणि विकी योग्य बाजारपेठ सहज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यास आता विशेष कृषी रेल्वेची सुविधा मिळणार आहे.
अशी असेल कृषी रेल्वे
येत्या सात ऑगस्ट पासून पहिली कृषी रेल्वे देवळाली रेल्वेस्थानकावरून सुटणार आहे. ही कृषी रेल्वे मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपुर मार्गे दानापूर या मार्गावर धावणार आहे. या कृषी रेल्वेचे भाडेही इतर नियमित मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या भाडयांपेक्षा कमी असेल. नव्याने सुरू होणा-या कृषी रेल्वेमुळे जिल्ह्यातील शेतक-यांना अवघ्या काही तासांत राज्यातील व राज्याबाहेरील बाजारपेठ उपलब्ध होणार असून यामुळे शेतक-यांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे गोडसे यांनी म्हटले आहे .