नाशिक – गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी बियाणासाठी कांदा शिल्लक ठेवला नाही आणि कंपन्यांच्या बीजोत्पादनात निम्म्याने घट झाली. परिणामी, आगामी हंगामाकरिता कांद्यासाठी शेतकऱ्यांचा एकराचा बियाण्याचा खर्च १२ हजारांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे पुढील हंगामात कांदा पिक घ्यावे की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे.
दरम्यान, देशभरात कांदा निर्यात बंदीचा प्रश्न गाजत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच जोरदार पावसामुळे चांदवड निफाड ,येवला, मालेगाव आदि तालुक्यात कांदयाची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सर्वसाधारणपणे ५०० ते एक हजार रुपये किलो भावाने बियाणे विकले गेले. आता दोन ते तीन हजार रुपये किलो भावाने शेतकऱ्यांना बियाणे विकत घ्यावे लागत आहे. एकराला सर्वसाधारणपणे साडेतीन ते चार किलो बियाणे लागते. उन्हाळ कांद्याचे उत्पादन देशभर घेतले जाते. त्यात महाराष्ट्राच्या जोडीला बिहार, हरियाना, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यांचा समावेश होता.
चाळीत ४० ते ४५ लाख टनांहून अधिक उन्हाळ कांदा
नोव्हेंबरच्या मध्यापासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उन्हाळ कांद्याची लागवड होते. हा कांदा एप्रिल ते जूनमध्ये बाजारात विक्रीसाठी येतो. हा कांदा चाळीमध्ये साठविला जात असून, ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत खाण्यासाठी पुरेसा ठरतो. देशाच्या गरजेपेक्षा अधिक उन्हाळ कांद्याचे उत्पादन झाले आहे. अजूनही खरीप कांदा बाजारात येईपर्यंत देशाला ३० लाख टनांपर्यंत कांदा पुरेसा ठरणार आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक कांदा शिल्लक असल्याने त्याला कितपत भाव मिळेल, अशी साशंकता होती.
आर्थिक गणित कोलमडणार
कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. उशीराचा खरीप अर्थात, रांगड्या कांद्याची लागवड खरिपातील पिके काढल्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरू होते. हा कांदा जानेवारी ते मार्चमध्ये बाजारात विक्रीसाठी येतो. खरिपामध्ये ४० लाख टनांपर्यंत उत्पादन अपेक्षित असते. पावसाच्या दुहेरी नुकसानीमुळे १५ ते २० लाख टनांपर्यंत खरिपाचे उत्पादन अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी भावाला प्राधान्य देत उन्हाळ कांद्याकडे लक्ष केंद्रित केल्यास रांगड्या कांद्याच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप कांद्याचे एकरी ५० ते ६०, रांगड्याचे ७० ते ८० आणि उन्हाळ कांद्याचे १२० ते १४० क्विंटल उत्पादन मिळते. उन्हाळ कांद्याच्या बियाण्यासाठी दुप्पट ते तिपटीने खर्च झाल्याने यंदाच्या उन्हाळ कांद्याच्या उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे.
घरचे बियाणे वापरावे
कांद्याचा खर्च कमी करण्यासाठी अनेक शेतकरी घरचे बियाणे वापरतात. परंतु सप्टेंबर महिन्याच्या मध्यात परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच कांदयाच्या रोपांचे देखील नुकसान झाले आहे. उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घरी बियाणे तयार करतात, आजवरची स्थिती पाहता, बाजारात चांगला भाव मिळायला लागला, की शेतकरी बियाण्यासाठी कांदा शिल्लक ठेवत नाही असे दिसून आले आहे. अशातच, निसर्गाच्या प्रतिसादाअभावी रोपवाटिकांचे नुकसान होते. हा विचित्र खेळ नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
घरचे बियाणे आता राहिलेच नाही. सर्व नुकसान झाले आहे नाशिक जिल्हा येथे खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. लावलेले कांदे खूप खराब झाले आहे.