मुंबई – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पाठविलेल्या नोटिसीनंतर भाजपवर आरोप करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपनेही पलटवार केला आहे. यासंदर्भात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांना खुले आव्हान दिले आहे.
ईडी ने पाठवलेल्या नोटिशीबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ कांगावा आहे. ईडीने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असं वाटत असेल तर राऊत यांनी ईडी विरोधात खुशाल न्यायालयात जावे, असा इशारा उपाध्ये यांनी दिला आहे. उपाध्ये म्हणाले की, खा. राऊत यांची पत्रकार परिषद ही फक्त आणि फक्त कांगावा करण्यासाठी होती. राजकीय षड्यंत्र वगैरे गोष्टी बोलण्यापेक्षा राऊत यांनी त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या नोटिशीबाबत ईडी कडे समाधानकारक उत्तर सादर करावे. ईडी ने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असेल तर राऊत यांना ईडी विरुद्ध न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. सोमवारी सकाळपर्यंत नोटीस मिळालीच नाही असे म्हणणाऱ्या राऊत यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद घेण्याऐवजी त्यांनी नोटीस का बजावली गेली यामागच्या कारणांचा शोध घ्यावा व ईडी पुढे आपले म्हणणे सादर करावे.तसे करण्याऐवजी खा.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा करण्याचा मार्ग स्वीकारला, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.