नवी दिल्ली ः काँग्रेसचा असंतुष्ट म्हणून ओळखल्या जाणा-या जी-२३ गटानं शनिवारी (२७ फेब्रुवारी) जम्मूमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान पुन्हा एकदा गांधी कुटुंबाच्या कार्यशैलीविरुद्ध आवाज उठवला आहे. पक्षाची दयनीय स्थिती पाहून शांत असलेले नेते आता नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
जी-२३ गटातील नेत्यांपैकी आनंदपूर साहिब (पंजाब) मधील खासदार मनीष तिवारी यांनी काँग्रेसला मजबूत विरोध पक्ष करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. जी-२३ चा अर्थ गांधी आहे आणि जी-२३ गांधींचे फॉलोअर आहेत. त्यामुळे जी-२३ चा वेगळा अर्थ काढणे चुकीचे ठरेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. हे काँग्रेसचे व्यासपीठ नसून, एक अराजकीय बैठक होती. त्यामध्ये जागरुक आणि प्रगतिशील एनजीओचे लोक सहाभागी होते. त्यांच्यामध्ये बहुमत मिळवून हुकूमशाही वृत्तीनुसार सरकार चालवणा-या भाजपविरुद्ध आवाज उठवण्याचे सामर्थ्य आहे. जम्मू-काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करून संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
पक्ष कमकुवत होत आहे हे सत्य आहे. हे सांगण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलो आहोत, असं ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले. पक्षाचं भले व्हावे म्हणूनच आम्ही एकत्र आवाज उठवला आहे. पक्ष मजबूत व्हायला हवा. आम्ही पक्षाचा सुवर्णकाळ पाहिला आहे. आता म्हातारपणी पक्षाची पडझड पहावत नाही, असेही सिब्बल म्हणाले. आम्ही सगळे फार विचार करून एकत्र आलो आहोत. आता पाचही राज्यांमध्ये आम्ही काँग्रेसचाच प्रचार करणार आहोत. पक्षाला मजबूत करण्यासाठी आमची धडपड सुरू आहे, असे नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.