मुंबई ः काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून देशात चर्चा सुरू असताना राज्याच्या अध्यक्षपदावरूनही काँग्रेसमध्ये खलबतं सुरू आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर असून ते प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता लागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीचा विषय अनेक दिवसांपासून रखडला असून, त्यामुळे पक्षात नाराजी पसरली आहे. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील या बदलासाठी निवडलेल्या कार्यपद्धतीबद्दल अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या महिन्यात प्रदेसाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीत गेले होते. राज्यात बदल करायचा असल्यास स्वतःहून राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती.
थोपटे, वरपूडकर, पटेल यांची नावे चर्चेत
विधासभा अध्यक्षपदासाठी आमदार संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांची नावं चर्चेत आहेत. संग्राम थोपटे भोर मतदारसंघातून तिस-यांदा आमदार झाले आहेत. त्यांचे वडील अनंत थोपटे काँग्रेसचे कडवे समर्थक ओळखले जातात. सुरेश वरपूडकर पाथरीमधून निवडून आले आहेत. ते १९९८-९९ मध्ये खासदारही होते. अमीन पटेल मुंबईमधून तिस-यांदा आमदार झाले आहेत.