मुंबई – अभिनेत्री आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या उर्मिला मातोंडकर या अखेर शिवसेनेत आल्या आहेत. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी समारंभात उर्मिला यांनी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आदेश बांदेकर, प्रियंका चतुर्वेदी आदी उपस्थित होते. सर्वप्रथम उर्मिला यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस वंदन केले. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांना शिवसेनेचे चिन्ह असलेली शाल घालून स्वागत केले. त्यानंतर त्यांना शिवबंधन बांधण्यात आले.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव यापूर्वीच शिफारस करण्यात आले आहे. तसेच, उर्मिला यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने उमेदवारी केली. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र, त्या सध्या काँग्रेसमध्ये खुष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच त्या शिवबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. बॉलिवूडमध्ये प्रख्यात असलेल्या उर्मिला यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केली आहे. त्यांनी राजकारणात सक्रीय होण्याचे निश्चित केल्यानेच लोकसभा निवडणूक लढविली. आता त्या शिवसेनेत जाणार असल्याने त्यांना कोणते पद आणि जबाबदारी मिळणार याची सध्या चर्चा सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसला आणखी एक सेलिब्रेटी सोडचिठ्ठी देत असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे.
सर्व फोटो – एनएनआयच्या सौजन्याने