नवी दिल्ली – देशातील सर्वात जुना असलेला कॉंग्रेस पक्ष आज (२८ डिसेंबर) १३६ व्या वर्षात प्रवेश करीत आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे इटलीला कालच रवाना झाले आहेत. राहूल यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची चिन्हे असताना तेच पक्षाच्या स्थापनादिनी अनुपस्थित असल्याने ही बाब सर्वत्र चर्चेची ठरली आहे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, राहुल गांधी हे दिल्लीहून कतार एअरवेजच्या विमानाने इटलीच्या मिलान शहरात खासगी दौर्यावर रवाना झाले, राहुल एका छोट्या वैयक्तिक दौर्यावर गेले आहेत. मात्र सुरजेवाला यांनी राहुल गांधी कोठे गेले हे उघड केले नाही. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी यांची आजी इटलीमध्ये राहत असून त्यांना भेटण्यासाठी ते गेले आहेत.
दरम्यान, आज सोमवारी कॉंग्रेसचा १३६ वा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुख्यालयात पक्षाचा झेंडा फडकावण्यात येणार असल्याचे कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी सुरजेवाला यांनी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी गोंधळ पसरवून भाजप नेतृत्व आणि सरकारला सत्य लपवायचे आहे. सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याबाबतच्या मौनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पक्षात चर्चा
पक्षाच्या स्थापना दिनीच प्रमुख नेते उपस्थित नसल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही फारसा उत्साह नसल्याचे दिसून येत आहे. तसेच, ऐतिहासिक परंपरा असलेल्या पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त पक्ष संघटन मजबूत करण्याची मोठी संधी असताना ती साधली जात नसल्याचेही जाणकारांचे म्हणेणे आहे.