नवी दिल्ली – अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये ‘लेटर बॉम्ब’ फुटला आहे. पक्षाच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधीना पत्र लिहिले आहे. तर, हे पत्र लिहिणारे भाजपला मदत करीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यावर काही ज्येष्ठ नेत्यांनी थेट ट्विटरवर प्रतिक्रीया दिली आहे. यासंदर्भातील वृत्त सर्व टिव्ही वाहिन्यांनी दिल्याने हा ‘लेटर बॉम्ब’ चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी या प्रभारी अध्यक्ष आहेत. एक वर्ष उलटले तरी अध्यक्षपदाचा निर्णय झाला नाही. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गांधी कुटुंबाव्यतिरीक्त व्यक्ती अध्यक्ष व्हावी, असे मत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुणाकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे. सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक ऑनलाईन सुरू झाली.
टिव्ही वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वीच २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया यांना पत्र लिहिले. अध्यक्ष कुणीही होवो पण त्याने पूर्णवेळ काम करावे. नेते व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे त्यात म्हटले आहे. मात्र, “इच्छा नसतानाही सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारले. त्या रुग्णालयात असताना प्रश्न उपस्थित करणे किती योग्य आहे?,” असा सवाल करीत राहूल यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या वागणुकीवर कठोर शब्दात टीका केली आहे.
सिब्बल यांच्याकडून ते ट्विट डिलिट
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ते ट्विट डिलिट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले होते की “राहुल गांधी म्हणतात आम्ही भाजपशी संधान साधले. राजस्थान हायकोर्टात काँग्रेसची बाजू मी मांडली. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पक्षाला मदत केली. गेल्या तीन वर्षात कोणत्याही विषयावर भाजपच्या बाजूने वक्तव्य केले नाही. तरीही आम्ही भाजपला मदत करतोय!”, असे ते ट्विट होते. मात्र, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुंह सूरजेवाला यांनी या वृत्ताचं खंडन केले आहे. राहूल यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही की त्यावर वाद निर्माण झालेला नाही, असे सूरजेवाला यांनी ट्विट करीत स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या लेटर बॉम्ब वरुन पक्षात खळबळ माजली आहे. आता पुढे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.