नाशिक – रेल्वे मंत्रालयाने नाशिक-धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात किसान रेल्वेच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर पॅकेजची’ अमलबजावणी आणि ‘अंत्योदयाची’ पायाभरणी करणेसाठी पुढाकार घेणे संदर्भात शेतकरी मित्रांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतमाल किसान रेल्वेने भारतभर जाण्यासाठी कसबे सुकेणे ते ओझर एचएएल हा रेल्वे मार्ग पुर्नजिवीत करुन ओझरला फलाट बांधावा तसेच
प्रलंबित मनमाड- मालेगाव- उमराणा- देवळा- सटाणा- पिंपळनेर -साक्री- नवापूर हा रेल्वेमार्ग ‘महारेल’ कडून कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पत्रात म्हटले की, मोदी सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान असलेली किसान रेल्वे ही योजना जाहीर केली आहे. शिवाय या किसान रेल्वेसाठी नाशिक- निफाड- कसबे सुकेणे -लासलगाव- मनमाड नांदगाव इत्यादी रेक पॉईंट दिल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव पर्यंत किसान रेल्वेची सुविधा पहिल्या टप्प्यात विस्तारली गेली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्या सोबत रेल्वेच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. त्यासाठी निम्मे अंतर असलेल्या कसबे सुकेणे ते ओझर पर्यंतची रेल्वे लाईन पुनर्जीवित करून सुरुवातीला येथून कामकाज सुरू केले तर नाशिक, दिंडोरी, निफाड तालुक्यातील शेतमाल भारतभर कमी किमतीत शेतकऱ्यांना पाठवता येणार आहे. यामुळे मोदींच्या आत्मनिर्भर योजनेला बळकटी मिळणार असून सोबत भाजीपाला भारतभर पोहोचविणाऱ्या ‘टोटल’ योजनेलाही फायदा होईल. कृषी पायाभूत सुविधा निर्माण योजनेतून प्रथम ओझर आणि नंतर पिंपळगाव पर्यंत रेल्वेची सुविधा मिळावी अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
पत्रात म्हटले आहे की, माजी खा. प्रतापदादा सोनवणे यांच्या कार्यकाळात मनमाड ते नवापूर (गुजरातच्या सीमेवर) हा नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील मध्य रेल्वेचे पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाबाबत घोषणा झाली होती, त्याचे सर्वेक्षण जाहीर झालेले होते. हा मार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात विकासाची दारे उघडी होणार आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये सुद्धा यामुळे जोडली जाणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील देवळा, सटाणा धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, साक्री आणि नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या तालुक्यातील शेतमाल मोठ्या प्रमाणात पश्चिम रेल्वेला जोडला जाऊन गुजरात – राजस्थान पर्यंत भाजीपाला पोचवता येणार आहे. यामध्ये विविध फळे, कांदा ,डाळिंब, द्राक्ष, टरबूज, पपई, सिताफळ इत्यादी शेतमाल कमी वाहतूक खर्चात पोचवला जाणार आहे. यामुळे प्रवासी रेल्वेसाठी ही व्यवहार्यता उपलब्ध होणार आहे. तसेच अत्यंत कमी उत्पन्न असलेल्या मानव विकास निर्देशांक आतील खालच्या स्तरावर असलेल्या बहुतांश आदिवासी बांधवांना आपल्या उन्नतीची दारे आपोआपच उघडून ते आत्मनिर्भर होतील. हा त्यांच्यासाठी आपल्याकडून अंत्योदय असेल, असे पत्रात म्हटले आहे. पत्रावर शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा, बापू पाटील, युवान फार्मर प्रोड्युसर कंपनीचे रवींद्र अमृतकर,
शरद शिंदे, सुधाकर धर्मा पाटील, दादाजी भूषण सूर्यवंशी, मोठा बोधनजी सोनवणे, अशोक माजी सोनवणे, संजय विठ्ठल सूर्यवंशी आदींची स्वाक्षरी आहे.