नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट या अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. ‘भोसले’ या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. सोमवारी ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मनोज वाजपेयीसह दाक्षिणात्य अभिनेता धनुष देखील या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
‘भोसले’ या चित्रपटाचा केंद्रबिंदू स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यातील द्वेष आणि प्रेम हा आहे. गणेश चतुर्थीला सुरू झालेला हा चित्रपट गणेश विसर्जनाच्या प्रसंगावर संपतो.
मनोज वाजपेयी भोसलेची भूमिका बजावतो आहे. तो आपल्या आयुष्यात सुखी आहे. पण तो रहात असलेल्या चाळीतील एक ड्रायव्हर बिहारींविरोधात सगळ्यांना भडकवतो आहे. तर त्याच चाळीत एक बिहारी मुलगी आपल्या भावासह राहते आहे. हे दोघेही भोसलेसोबत एका नात्यात एकत्र जोडले जातात. ही जी सगळी कथा आहे, तीच यात आहे.
मनोज वाजपेयी याला यापूर्वी २००० मध्ये आलेल्या ‘सत्या’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकार आणि २००५ मध्ये आलेल्या ‘पिंजर’ चित्रपटासाठी स्पेशल ज्युरी पुरस्कार देण्यात आला आहे.
तर धनुष याला ‘असुरन’ चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. कोरोनामुळे हा पुरस्कार समारंभ जवळपास वर्षभराने होत आहे. हा समारंभ ३ मे रोजी होतो, पण कोरोनामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. यावेळी ४६१ चित्रपट आणि नॉन फिल्म प्रकारात २२० चित्रपटांचा समावेश होता.