नाशिक – कवी शरद अमृतकर यांच्या ‘ गोधडी’ या काव्यसंग्रहाचे नाशिक येथील अभियंता नगर येथे छोटेखानी समारंभात प्रा. गंगाधर अहिरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. शिक्षक असलेल्या अमृतकरांचा हा पहिलाच काव्यसंग्रह आहे.
ठसा प्रकाशन ग्रुह नाशिकचे बुध्दभुषण साळवे, सामाजिक चळवळीतील जेष्ठ नेते करूणासागर पगारे, जेष्ठ विधीज्ज्ञ कवी आशोक बनसोडे, निवृत्त विस्तार अधिकारी वाघ, गायत्री अमृतकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संग्रहाचे आशयसंपन्न मुखपृष्ठ बुध्दभुषण साळवे यांनी रेखाटले आहे. “कवीची नाळ ही ग्राम्य संस्कृतीशी व वारकरी सांप्रदयाशी घट्ट असल्याने, समतावादी ममत्व कवीच्या कवितेतून उजागर होते. ‘गोधडी’ ही दारिद्रयाचे प्रतिक असली तरी, वंशपरंपरेने जतन केलेल्या “गोधडी’मध्ये कवीवर झालेले सुप्त रुपातील सत्शील संस्कार दडलेले आहेत. त्या जाणिवांचे उत्कट अक्षर प्रक्षेपण म्हणजे हा काव्यसंग्रह आहे. काव्यनिर्मितीची अनेक आशयघन मुलद्रव्य या संग्रहात लखलखीत आहेत.” असे प्रतिपादन प्रा. अहिरे यांनी प्रकाशनाच्या निमित्ताने केले.
‘संतपरंपरेचा प्रभाव असलेला व माणूसपणाचे दर्शन घडविणारा हा संग्रह आहे’, अशा भावना कवी बनसोडे यांनी व्यक्त केली. तर सामाजिक आशय व मानवतावादी द्रुष्टी असलेला हा संग्रह वाचकांना निश्चितच प्रेरक ठरेल, असा आशावाद करूणासागर पगारे यांनी व्यक्त केला. वाघ यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. कवी शरद अमृतकर यांनी आई-वडिलांचे ऋण व्यक्त करुन, आपल्या काव्यनिर्मिती संबंधाने सविस्तर मनोगत व्यक्त केले. प्रा. संदीप अमृतकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.