प्रतिभासंपन्न कवयित्री शांताबाई शेळके यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने मनमाडचे प्रसिध्द फोटोग्राफर राजेंद्र गुप्ता यांनी नांदगावचे पत्रकार व माजी नगराध्यक्ष भास्कर कदम यांना शांताबाई शेळके यांच्या नांदगावच्या आठवणी शेयर केल्या. शांताबाई यांचे काही वर्षं नांदगावच्या गुप्ता कॉलोनीत वास्तव्य होते. त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र, प्रल्हाददासजी गुप्ता यांच्या बरोबरचे फोटो त्यांनी पत्रकार भास्कर कदम यांना पाठवले. त्यानंतर कदम यांनी शांताबाई व नांदगाव असा लेख पाठवला. या सर्व आठवणी जागवणारे पत्र, लेख व फोटो वाचकांसाठी……
शांताबाई शेळके व नांदगाव
– भास्कर कदम, नांदगाव
शांताबाईंनी ‘धुळपाटी’वरील पहिली अक्षरे ‘नांदगाव’ला गिरविली ! नांदगावला शांताबाई शेळके यांचे बालपण गेले आहे. शांताबाई शेळके यांनी नांदगावच्या गुप्ता कॉलनीतील आठवणींची `धूळपाटी` आपल्या आत्मचरित्रात रंगविली आहे. याचा आम्हा नांदगावकरांना रास्त अभिमान आहे. शांताबाई म्हणतात नांदगावचे दिवस सर्वात सुखाचे होते. गुप्ता शेठने राहायला बंगल्यात जागा दिली होती. दिलेला बंगला छोटा पण सुबक होता. नांदगावला प्रल्हाद शेठ गुप्ता, पांडुरंगबाबा कवडे, विनायक पाटील हे त्यांच्या वडिलांचे घनिष्ठ मित्र होते. त्यांचे वडील नांदगावला वनाधिकारी म्हणून बदलून आले होते. गुप्ता-कवडे-पाटील या मित्रांनी शांताबाईच्या वडिलांना `नांदगावमध्येच घर घ्या, जमीन घ्या, इथेच कायमचे स्थाईक व्हा` असा सल्ला दिला होता. त्यांच्या वडिलांनाही तसे वाटू लागले होते. असे घडले असते तर महाराष्ट्रातील ख्यातनाम कवयित्री, लेखक, साहित्यिक, पत्रकार, गीतकार तथा अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा खऱ्याअर्थाने `नांदगाव`कर झाल्या असत्या. नांदगावच्या इतिहासात ते एक मानाचे पान झाले असते. परंतु त्यांचे फक्त बालपण येथे गेले. त्यांच्या साहित्यिक जीवनाला आकार येथेच मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण त्यांना या भागातील निसर्गाने, पक्षांच्या किलबिलाटाने तरल मनाला रिझविले होते, घडविले होते. असे शांताबाई शेळके यांच्या बालपणाचे आवडीचे नांदगावचे अमीट असे नाते होते. त्यांनी खऱ्याअर्थाने नांदगावमध्येच आपल्या `धुळपाटी`वरील पहिली अक्षरे गिरविली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
शांताबाई शेळके यांनी धूळपाटी या आत्मचरित्रात नांदगावच्या बालपणीच्या आठवणी विस्तृतपणे लिहिल्या आहेत. त्यांना, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नांदगावमधील माणसे मनापासून भावली होती. त्याचबरोबर परिसर खूपच आवडला होता. इथल्या वातावरणाशी, माणसांशी ते एकरूप झाले होते. शांताबाई यांना येथील शाळेत टाकायला त्यांचे वडील घेवून गेले असता, त्यांनी रडून ओरडून शाळेत जाण्यास नकार दिला होता. त्या पळून घरी लपून बसल्या होत्या. घरी आल्यावर त्यांच्या वडिलांनी पोटभर चोप दिला होता. शांताबाई यांनी नांदगावविषयी अतिशय आत्मीयतेने लिहिले आहे. त्यांनी पुरणाचे मांडे पहिल्यांदा पांडुरंग कवडेकाका यांच्याकडे खाल्ले. इतकेच काय तर पहिले नाटक `शारदा` हे त्यांनी नांदगावीच पाहिले. शारदा नाटकाचा त्यांच्या बालमनावर खोलवर परिणाम झाला होता. त्यांना नाटकातील शारदाचे घर खरोखरचे वाटले होते. शांताबाई यांचे वडील वनखात्यात अधिकारी होते. नांदगाव परिसरात वन विभागाचे मोठे क्षेत्र आहे. त्या वेळी ते वनराईने भरलेले, पशुपक्षांनी गजबजलेले होते.
शांताबाई आपल्या धूळपाटीत नांदगाव विषयी लिहितात, नांदगावहून दादांची बदली झाली तेव्हा नांदगावच्या सर्व मित्र मंडळींना फार वाईट वाटले. आम्हालाही नांदगाव सोडून जाणे जीवावर आले होते. आमचे जायचे ठरल्यावर कित्येक दिवस गावात मेजवान्या झडत होत्या. यातीलच पहिल्या मांड्याची आठवण आहे. फुटक्या मडक्याचे बुड पालथे घालून त्यावर मांडे करणारी बाई ते भाजीत होती. आत पुरण भरलेली लहानशी लाटी घेवून ती हातावरच भराभर तिचा मोठा विस्तार करी आणि तो मांडा ती मोठ्या सफाईने मडक्याच्या बुडावर घाली. ते खमंग आणि खुसखुशीत मांडे दुधा तुपाशी खातांना झालेला आनंद आणि वाटलेले नवल अजूनही आठवते. अशाप्रकारे शांताबाई शेवटपर्यंत नांदगावला विसरल्या नाहीत.
शांताबाई शेळके यांचे जितके प्रेम नांदगावकरांवर होते, त्याहून अधिकचा अभिमान आम्हा नांदगावकरांना त्यांचा आहे. कारण कुठल्याही कळसापेक्षा पाया भरणी मजबूत असावी लागते, ती मुख्य भूमिका नांदगावची होती. ते शांताबाई यांनी स्वतः मान्य केल्याने त्याचे महत्व अधिक आहे. शांताबाईंनी लता मंगेशकर यांनाही नांदगाव विषयी कल्पना दिली होती. लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचेही वास्तव्य काहीकाळ नांदगावच्या याच गुप्ता कॉलनीत होते. नटसम्राट दत्ता भट हे सुद्धा गुप्ता कॉलनीत काहीकाळ वास्तव्यास होते. नांदगावचा भूतकाळ अत्यंत वैभवशाली होता. निसर्गाने भरभरुन दिले, पाणी मुबलक होते. माणसंही फारशी कोत्या मनाची नव्हती. नांदगावचे गतवैभव वेगवेगळ्या निमित्त-कारणाने थोडेथोडे नव्या पिढीसमोर ठेवीत आहे. नांदगावच्या विकासाची, वैभवाची भूक मोठी आहे. ‘भूखा फकीर पिछली कंदुरी याद करता है’ अशी काहीशी सध्याची अवस्था आहे.
शांताबाई यांचे लेखन साहित्य, अजरामर गीते यामुळे त्यांचे त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला. चाळीस वर्षापूर्वी नांदगाव महाविद्यालयाने त्यांना स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आमंत्रित केले होते. त्याप्रसंगी त्यांनी या सर्व बालपणीच्या आठवणी जागवल्या. त्यावेळी त्यांच्याहस्ते मला पारितोषिक स्वीकारताना मोठा अभिमान वाटला. आजही हे अप्रूप माझ्या मनात कायम आहे.
शांताबाई आणि नांदगावच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या मान्यवरांचे आभार… नांदगाव माझे आजोळ असल्याचा मलाही सार्थ अभिमान वाटतो….
-रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर,९४२३०९०५२६