जळगाव – कवीने आपल्या कलाकृतीकडे अत्यन्त संवेदनशील वृत्तीने पाहिले पाहिजे.कविताही फेस पावडर सारखी वरून लिंबाची किंवा लावायची गोष्ट नाही तर ती आई होऊन गर्भा सारखी जपायची आणि जोपासायची गोष्ट असते.या जाणिवेतून पाहिले पाहिजे.सामाजिक जाणिवेतून समाजमना चे बिंब प्रतिबिंब त्यांच्या कवितेत पडले पाहिजे.आपल्या अवतीभवतीच्या वास्तवाचा कवीच्या संवेदनशील मनावर परिणाम होतो .त्या परिणामाचा त्या वेदनेचा ओमकार कवितेच्या रूपाने शब्दबद्ध झाला पाहिजे .असे विचार पिंपळगाव बसवंतचे ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य प्राचार्य लक्ष्मण महाडिक यांनी व्यक्त केले .
सर्वोदय साहित्य मंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या व्याख्यानमालेतील सातवे पुष्प त्यानी ‘कविता कशी स्फुरते ‘ या विषयावर गुंफले. ते पुढे म्हणाले की चांगली कविता अवतीभोवतीच्या वास्तवाच्या अवलोकनातून जन्म घेते.असे अवलोकन काव्य लेखनाला पूरक ठरत असते. कवितेने सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे. कलावंत हा समाजाचे काही देणे लागतो. हे विसरता कामा नये.माणसाच्या जगण्याची कविता आली पाहिजे . या जाणिवेतून कविता लिहिली जावी.तशी लिहिली जात नाही .नुसती शब्दांची जुळवाजुळव न करता कविता आतड्याचा पीळ घेऊन आली पाहिजे.’तळ हातावरच्या जखमा कागदावर पुसता पुसता … मीच कवितेचा बाप झालो,’ अशा प्रकारच्या आतड्याच्या पिळातून आलेल्या कवितेला शब्द ,रूप,लय शोधावी लागत नाही. आपण समाजाचे काही देणे लागतो.हे विसरता कामा नये.सामाजिक जाणिवेची कविता ही समाज मनावर अधिराज्य करते, .असे ते म्हणाले . या संदर्भात त्यांनी अनेक संदर्भ आणि दाखले देताना आपल्या आशयगर्भ कवितांचे दाखले देऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यावेळी ‘शब्द वारकरी झाले ,नंदी बैल आला हो …नंदी बैल आला , तुम्हीच हाती शस्त्र घ्या…तुम्हीच आता अस्त्र व्हा… नागवलेल्या द्रौपदीचें तुम्हीच आता वस्त्र व्हावा, टाक पोरी टाक आता ….पाऊल थोडं पुढं, पहिला पाऊस झेलशील जेव्हा…., गावदेवीला नवसा पायी कुणी सोडला वळू….याच्या भीतीनं गायी वासरं समदेच लागले पळू, गेले मोट आणि नाडे.. कुठे ढासळले वाडे ?,बापाच्या मृत्यूनंतर सरकार दप्तरी नोंद करताना …,मज विठ्ठल भेटला , शब्द वारकरी झाले ,ऊठ वेड्या घर बांध, काहीतरी करून कसं काहीतरी करूनच झटपट करा…,गुबूगुबू वाजवीत कोण आला दारी ,संस्थांची झाली संस्थाने आणि खुर्च्यांची झाली सिंहासने ,यासारख्या अनेक विविध कविता सादर केल्या . छंदोबद्ध,मुक्तछंद ,अभंग, ओवी ,लावणी असे कवितेचे विविध प्रकार त्यांनी आपल्या कवितांतून त्यांनी व्यक्त केले. शेती आणि मातीवर अत्यंत प्रभावी कविता सादर करून प्रेक्षकांची श्रोत्यांची वाहवा मिळवली . कलावंत हा समाजाचे देणे लागतो, या भूमिकेतून कवीने सामाजिक प्रश्नांची उत्तरे आपल्या कवितेतून सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे . साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते हे न विसरता समाजातील सामाजिक प्रश्नावर , दुष्ट रूढी ,परंपरावर कवींनी आपल्या शब्दांचे वार केले पाहिजे. व्यक्त केले पाहिजे. अलीकडे कवी उदंड झाले असले तरी अनेक कवी अत्यंत चिंतनशील वृत्तीने कवितेकडे बघतात .अशा कवींना आणि त्यांच्या कवितांना चांगले दिवस येतील हा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या आरंभी सूर्योदय साहित्य मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी प्रास्तविक केले.