मुंबई/नाशिक- सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊतची क्लास वन अधिकारी करण्याच्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयात तब्बल २०१४ पासून धुळखात पडली असल्याची बाब समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना क्लाव वन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याचे राज्य सरकारने जाहिर केले. त्यानुसार काही खेळाडूंना नियुक्ती देण्यात आली. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून या प्रस्तावावर काहीच होत नसल्याने अखेर कविताने थेट राज्यपाल भगत सिंह कोश्याची यांच्याकडे दाद मागितली आहे.
क्रीडा विभागाकडे प्रस्ताव असला तरी त्यावर योग्य ती कार्यवाही अद्याप झालेली नाही. सध्या कविता ओएनजीसी या केंद्र सरकारच्या कंपनीत कार्यरत आहे. तिला डेहराडून येथे पोस्टिंग देण्यात आली आहे. मंत्रालयात वारंवार चकरा मारल्या. तसेच, विविध लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची भेट घेतली तरी काम होत नसल्याने कविताने नाराजी व्यक्त केली आहे. अखेर राज्यपालांना तिने पत्र दिले आहे. सरकारच्या घोषणेनुसार आणि अन्य खेळाडूंना न्याय दिल्याप्रमाणे आपल्यालाही मिळावा, अशी विनंती तिने केली आहे. कविताने अनेक मॅरेथॉनमध्ये यश मिळविले आहे. राष्ट्रकुल खेळात देशासाठी पदक मिळविले. ऑलिम्पिकमध्येही ती सहभागी झाली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा या छोट्याशा गावातून आलेल्या कविताने देशासाठी मौल्यवान कामगिरी केली आहे.