कळवण – मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचालित सटाणा येथील सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्र विभागाच्या प्राध्यापिका सौ. सोनाली रमेश देवरे (काकुळते) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून एमफील पदवी प्रदान करण्यात आली.
सोनाली देवरे (काकुळते) यांनी स्टडीज ऑन ड्रायव्हरसिटीअँड फीडिंग पोटॅशियल ऑफ सम सिलेक्टेड लेडीबर्ड बीटल (कोकसीनेलीडस) फ्रॉम नॉर्थ महाराष्ट्र, इंडिया या विषयावर संशोधन करून शोधकार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांना एमफील पदवी प्रदान करण्यात आली. संशोधनामध्ये जे लेडीबर्ड बीटल आहेत ते बायोकंट्रोल एजंट म्हणून ओळखले जातात आणि ते ऍग्रीककल्चर इंडस्ट्रीमध्ये खूप उपयोगी आहे असे प्रा. सोनाली देवरे (काकुळते) यांनी या संशोधनातून सिद्ध केले.
केटीएचएम महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. ए.ई.देसाई यांनी त्यांना मार्गदर्शन केले. बहि:स्थ पर्यवेक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. चंद्रशेखर हिवरे होते. के.टी.एच.एम महाविद्यालयाचे प्राणी शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विक्रम काकुळते यांच्या समवेत त्यांची मौखिक परीक्षा संपन्न झाली.
प्रा. सोनाली देवरे (काकुळते) यांना एमफील पदवी मिळाल्याबद्दल म.वि.प्र. समाज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा निलीमाताई पवार, केटीएचएम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाकडून व सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. सोनाली देवरे (काकुळते) या खर्डे येथील प्रगतशील शेतकरी रमेश देवरे यांच्या कन्या तर सेवानिवृत्त शिक्षक एस.एस. काकुळते यांच्या सून आहेत.