– कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करा
– यंत्रणेने फिल्डवर प्रत्यक्षात काम करा
कळवण – कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत असून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करुन कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासकीय यंत्रणेने प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन काम करुन शासन निगर्मीत सूचनाची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी सूचना आमदार नितीन पवारांची यांनी बैठकीत केली.
कळवण येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवण व सुरगाणा तालुक्यातील प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आमदार नितीन पवार यांनी कोरोना विषाणू निर्मूलन बैठक घेऊन दोन्ही तालुक्याचा आढावा घेऊन यंत्रणेला सक्रीय केले.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी शासनाकडून निगर्मीत केलेल्या सूचनाची पायमल्ली होत असून कागदोपत्री प्रतिबाधित क्षेत्र तयार करुन कागदावर शासन आदेश पूर्ण करत असल्याचे चित्र असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने काही आदेश निगर्मीत केले आहे त्याचे काटेकोर पालन करण्याची सूचना आमदार पवार यांनी यावेळी केली.
कळवण व सुरगाणा तालुक्यातील ॲंटीजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण ७५ टक्क्यांवर करावे ,होम आयसोलेशनपेक्षा संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा ,लसीकरणाच्या मोहिमेला अधिक गती द्यावी ,मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी ,शासकीय व खासगी रुग्णालयातील बेडचे एककेंद्रीय पद्धतीने नियोजन करावे ,ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध व सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी प्रशासनाला सूचना दिल्या.
यावेळी प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असं स्पष्ट मत आमदार पवार यांनी व्यक्त करुन अधिक कोरोना रुग्ण असलेल्या ठिकाणी हॉटस्पॉट घोषित करताना कळवण व सुरगाण्यातील नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर द्यावा. कळवण व सुरगाणा तालुक्यातील अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे.नागरिकांपर्यंत पोहोचून कोरोनाबाबत जनजागृती करावी. ऑक्सिजन बेडची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना केल्या.
कळवण शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनानं कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आमदार पवार यांनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसंच अन्यत्र गर्दी होणार नाही; सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले.
लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रमासाठी नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणं अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी,कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्यानं काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे या त्रिसुत्रीवर भर देत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी केले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, कळवणचे तहसीलदार बी.ए.कापसे, सुरगाण्याचे तहसीलदार किशोर मराठे,कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सुरगाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशीकांत बोडके, अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, बा-हे सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील व डॉ. रणवीर मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल, गट विकास अधिकारी डी एम बहिरम , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सभापती सौ.मनीषा पवार,उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संदीप वाघ,. सुनिल देवरे आदीसह राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.