राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमदार नितीन पवारांचे साकडे
कळवण – कळवण व सुरगाणा या १०० टक्के आदिवासी तालुक्यातील वननिवासी व इतर पारंपारिक वननिवासी यांना हक्काचा स्वतंत्र सातबारा द्यावा, सध्यास्थितीत वनपट्टे कसत असलेल्या आदिवासींना त्यांच्या हक्काचे प्रमाणपत्र व ताब्यात कसत असलेली वनजमीन द्यावी, कळवण व सुरगाणा तालुक्यात पाणी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वनविभागाने लघुपाटबंधारे योजना, छोटे-मोठे बंधारे व तलाव बांधण्यासाठी नियम व अटी शिथील करावे यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती कळवणचे आमदार नितीन पवार यांनी करुन प्रश्नांची सोडवणूक करण्याचे साकडे घातले.
राज्यातील आदिवासी समाजाला अनेक वर्षांपासून भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच स्वतंत्र विशेष बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी दिले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्व आदिवासी क्षेत्रातील आमदाराच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली.
आमदार नितीन पवार यांनी यावेळी निवेदन देऊन त्यात नमूद केले आहे की, कळवण व सुरगाणा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राला लागू असलेला पेसा कायदा अधिक प्रभावीपणे राबवून गावांच्या विकासाला गती द्यावी, वन पट्टेधारक शेतकरी वनपट्ट्यात पोट खराबा असलेल्या क्षेत्रात शेती करतात त्या जमिनी लागावडीखालील क्षेत्रात समाविष्ट करुन नुकसान भरपाई द्यावी, त्याचबरोबर सातबारा आणि मालकी हक्क द्यावा, पेसा कायदा १९८५ मध्ये अंमलात आला असून त्यामध्ये काही गावांचा समावेश झालेला नसल्यामुळे या गावांना कोणताही लाभ मिळत नाही. या गावांचा पेसा कायद्याअंतर्गत समावेश करावा, २०१४ मध्ये वनविभागाची जी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदस्थापना द्यावे . वन विभागाच्या हद्दीत नदी व नाल्यांवर जल संवर्धनासाठी बंधारे बांधकामाच्या अटींमध्ये शिथिलता आणणे. उर्वरित वैधानिक विकास महामंडळाप्रमाणे आदिवासी विकास महामंडळास स्वायत्तता द्यावी. आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन सर्वसाधारण अर्थसंकल्पातून द्यावे. पेसा अंतर्गत घोषित झालेली गावे महसूल विभागात समाविष्ट करावी.आदिवासी सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन करून कर्जमाफीचा प्रश्न पिकपाणी-सदरी बाबत उताऱ्यावर आदिवासी असे स्वतंत्र नाव यावे याबाबत आमदार नितीन पवार यांनी निवेदन दिले.
या शिष्टमंडळात आमदार नितीन पवार धर्मराव बाबा आत्राम,शिरीषकुमार नाईक, श्रीनिवास वनगा, मंजुळा गावीत, विनोद निकोले, सुनिल भुसारा, राजकुमार पटेल, दिलीप बोरसे, राजेश पाटील आदी विधीमंडळ सदस्यांनी राज्यपालांकडे मागण्या मांडल्या.