कोरोनावर मात करण्यासाठी कळवणकरांनी कसली कंबर, गुढी पाडवा सणावर गंडांतर
कळवण – कळवण शहर व तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असल्यामुळे कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघाने १२ ते १८ एप्रिलपर्यंत कळवण शहर व तालुक्यात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्धार केल्यामुळे तालुक्यात जनता कर्फ्यूला सर्वस्तरांतून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाला असून कळवण, अभोणा, कनाशी, नवीबेज, सप्तश्रुंगी गड आदी भागातील नागरिक व व्यापारी बांधवानी जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेत आपली प्रतिष्ठाने १०० टक्के बंद ठेवली व घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे गुढी पाडवा सणावर जनता कर्फ्यूमुळे गंडांतर आले आहे. कळवण शहरातील व तालुक्यातील व्यापारी व व्यावसायिकानी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कोरोनाबाबत कळवणकर दक्ष असल्याचे जनता कर्फ्यूवरुन दिसून आले. आज सोमवार असल्यामुळे शासकीय कार्यालयमुळे ५० % पेक्षा कमी उपस्थिती दिसून आली तर राष्ट्रीयकृत, सहकारी बँकामध्ये व पतसंस्थामध्ये गर्दी दिसून आली.
पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम यांनी पोलीस यंत्रणेची शहरात ठिकठिकाणी मजबूत फळी उभारली. पोलीस वाहनातून पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे स्वतः ध्वनीक्षेपणावरून वारंवार नियमांचे पालन करण्याबाबत कळवणकरांना सूचना देत होते. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू पुकारल्यामुळे कळवण शहरातील बाजारापेठा बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे कळवण शहरासह तालुक्यात अभोणा, कनाशी, नवीबेज, जयदर, सप्तश्रुंग गड, पाळे, देसराने, मोकभणगी आदी गावासह तालुक्यातील जनतेने घरात राहणे पसंत केले त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवल्यामुळे १०० टक्के जनता कर्फ्यू पाळण्यात यश आले त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र शांतता दिसून आली.
जनता कर्फ्यूत टपरीपासून किराणा, सलून, कापड, रेडिमेड, कटलरी, इलेक्ट्रिक, हॉटेल, मसाला, वाईन शॉपपर्यंत सर्व काही बंद ठेवण्यात आले.तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात व्यावसायिकांनी आपले दुकानें बंद करुन सहभाग नोंदवला त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर व तालुक्यातील जनता सज्ज आहे हे दिसून आले.
गुढी पाडवा सणावर गंडांतर-
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तासाठी खरेदीची लगबग कळवण अभोणा कनाशीच्या बाजारपेठेत नेहमीच असते. त्यासाठी व्यापाऱ्यांनी तयारी केली. मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवून माल खरेदी केला. शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे गुढी पाडवा सणावर गंडांतर आले आहे.
त्या बाकड्याना देखील शांतता मिळाली –
कळवण शहरातील एसटी बसस्थानक, मराठी शाळा, गणेशनगर, मेनरोड परिसरात असणाऱ्या चहाच्या टपऱ्या व दुकानावर चहा पिण्यासाठी पहाटेपासून वर्दळ सुरु होते. चहा पिण्याच्या निमित्ताने टपरी लगत असलेल्या बाकड्यावर बसून नेहमीचे ग्राहक गप्पा मारतात तर या टपरीवर सकाळी चहा पिऊन दिवसाची सुरवात करणाऱ्या कळवणकरानी देखील जनता कर्फ्यूमुळे चहाचा आस्वाद घेतला नाहीं त्यामुळे त्या बाकड्याना देखील आज शांतता मिळाली.