– मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करा – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची सूचना
– जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार नितीन पवारांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
…..
कळवण – कळवण व सुरगाणा तालुक्यात अनेकांना मोबाईलच्या नेटवर्कमुळे त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील वस्तीत विकसित व अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचले नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यानी सुरळीत सेवा द्यावी, बंद असलेले टॉवर सुरु करावे, वनविभागाने ना हरकत दाखले द्यावे व जनतेला सुरळीत सेवा द्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मोबाईल कंपन्याच्या प्रमुखांना केली.
आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यात मोबाईल कंपन्याचे टॉवर बंद असल्यामुळे सेवा सुरळीत मिळत नसल्याची तक्रार करुन सुरळीत सेवा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या दालनात आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार, वन अधिकारी,मोबाईल कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होऊन जिल्हाधिकारी मांढरे यांनी अडचणी जाणून घेत तात्काळ सुरळीत सेवेसंदर्भात पाऊले उचलण्याची सूचना बैठकीत केली.
यावेळी कळवण तालुक्यातील २७ टॉवर पैकी ४ टॉवर पुर्ण बंद असुन सुरगाणा तालुक्यातील ३७ टॉवर पैकी १६ टॉवर बंद असलेले टॉवर तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदार नितीन पवार यांनी बैठकीत करुन भ्रमणध्वनी सेवेच्या भोंगळ कारभाराकडे जिल्हाधिकारी मांढरे यांचे लक्ष वेधले.
जिल्हाधिकारी मांढरे यांनी मोबाईल टॉवर कंपनीचे प्रतिनिधी यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सुरगाणा तालुक्यातील वनविभागाचा ना हरकत दाखला मिळण्यास अडचणी असल्यामुळे टॉवरचे काम रखडले आहे. त्यामुळे वनविभागाने त्यास परवानगी देण्याच्या सूचना आमदार नितीन पवार यांनी नाशिक पूर्वचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांना दिल्या.
सदर बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना, उप वनसंरक्षक तुषार चव्हाण, कळवण तहसीलदार बी.ए.कापसे, मोबाईल टॉवर कंपनीचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मोबाईलची नेटवर्क नसल्याने इंटरनेट नाही —
कळवण व सुरगाणा तालुक्यात अनेकांना मोबाईलच्या नेटवर्कमुळे त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील वस्तीत विकसित अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचले नसल्याची परिस्थिती असून ४ जी सेवा असतानाही मोबाईलला २ जी किंवा ३ जी यांना इतकी नेटवर्क मिळत आहे . सध्या सर्वत्रच अनेक नामांकित कंपन्यांच्या मोबाईल सेवा कार्यरत आहे , मात्र यापैकी अपवाद वगळता बहुतेक कंपन्यांच्या सेवेचा पूर्ण फज्जा उडाला गेला आहे . सध्या मोबाईल नेटवर्क समस्येने गंभीर रूप धारण केले आहे . काही गावातच मोबाईलला रेंज नाही , तर इंटरनेट तर खूप लांबची गोष्ट आहे . मोबाईलची नेटवर्क नसल्याने इंटरनेट चालत नाही अशीच परिस्थिती कळवण व सुरगाणा तालुक्यात अनेक ठिकाणी आहे .