– सुरगाण्यातील सिंचनासाठी वनविभागाच्या अटी शिथिल करा, पश्चिम घाट परीसंवेदनशील मधून कळवण सुरगाणा वगळा – आ. नितीन पवार
– कळवण सुरगाण्यात औद्योगिक वसाहत स्थापन करा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करा
….
कळवण – सुरगाण्यातील सिंचनासाठी वनविभागाच्या अटी शिथिल करा, पश्चिम घाट परीसंवेदनशील मधून कळवण सुरगाणा वगळा, पारंपरिक वननिवासी यांच्या अडीअडचणीची सोडवणूक करा, कळवण सुरगाण्यात औद्योगिक वसाहत स्थापन करा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करा यासह पाणी, रस्ते, शिक्षण, सिंचन, पर्यटन विकासासाठी भरघोस निधी देऊन विकासाचा अनुशेष भरुन काढा अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरेना आमदार नितीन पवारांनी करुन स्नेहभोजनात साकडे घातले.
मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार नितीन पवारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी वार्तालाप करतांना मतदार संघातील समस्याचे निवेदन देऊन पाणी, रस्ते, सिंचन, पर्यटन, वन, आरोग्य, वीज सुविधासाठी भरघोष निधी देऊन विकासाचा अनुशेष भरुन काढा अशी विनंती केली व राज्यातील आदिवासी बांधवांना खावटी योजना लागु केल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे यावेळी आमदार पवार यांनी आभार मानले.
कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांमध्ये व सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाचे 50 खाटांमध्ये श्रेणीवर्धन व त्याप्रमाणात पद निर्मिती करावी, हतगड,चणकापुर व अर्जुनसागर (पुनद ) प्रकल्प भागात पर्यटन विकासाला चालना देऊन सापुताराच्या धर्तीवर परिसर विकसित करावा. सप्तशृंगीगड “ब” वर्ग तीर्थक्षेत्र विकास कामासाठी निधीची तरतूद करावी, कळवण येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व औद्योगिक वसाहत स्थापन करावी, सुरगाणा तालुक्यात वळण योजना राबविताना पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून सुरगाणा तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव, सिमेंट बंधारे व धरणांचे कामे मार्गी लावावी,कळवण व सुरगाणा तालुक्यातील वनपट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा उतारा द्या.सुरगाणा व कळवण तालुक्याला पश्चिम घाट परीसंवेदनशीलमधून वगळावे यासह मूलभूत प्रश्नासंदर्भात लेखी निवेदन आमदार नितीन पवार यांनी दिले.
कळवण व सुरगाणा या आदिवासी बहुल भागातील विविध अडचणी निवेदन वाचून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी समस्या समजावून घेत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन निधी उपलब्ध करुन देण्याचा शब्द आमदार नितीन पवारांना दिला.
कळवण तालुक्यात कांदा महत्वाचे पिक असल्यामुळे बाजार भावाबाबत येत असलेल्या अडचणी, सतत चढ उतार आणि बाजार भाव वाढले की निर्यातबंदीचे धोरण त्यामुळे कांद्याची निर्यात सुरू राहण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकरी बांधवाना दिलासा द्यावा अशी विनंती आमदार नितीन पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना यावेळी केली.