कळवण – कळवण शहरातील ५ वर्षाच्या विश्वासाची अन विकासाची लोकाभिमुख कार्याची वचनपूर्ती ही विकासकामांचा लेखाजोखा’ असलेल्या पुस्तिकेची सुंपूर्ण कळवण शहरात चर्चा सुरू आहे. कळवण नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कळवण शहर व तालुका यांच्याकडून गत पाच वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा असणारा संपूर्ण अहवाल या पुस्तिकेच्या रूपात प्रकाशित करण्यात आला आहे. यामुळे शहरवासीयांकडून किती प्रमाणात मतांचे दान महाविकास पारड्यात पडेल हे येणारा काळच ठरविणार आहे.
कळवण नगरपंचायतच्या माध्यमातून पहिली ५ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेची सुत्रे हाकली आहेत. यामुळे ५ वर्षांचा कार्यकाळ हा एका पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतो. यामुळे नगरपंचायतमधील सत्तेची परंपरा अखंड ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने प्रकाशित केलेली विकासाची अन विश्वासाची लोकाभिमुख कार्याची वचनपूर्ती ह्या पुस्तिकेच्या माध्यमातून विकास कामांचा लेखाजोखा’ मतदारांच्या किती पसंतीस उतरणार आहे. हे येणारा काळच ठरविणार.
या पुस्तिकेत गत पाच वर्षाच्या कार्यकाळात कळवण शहरातील विकासकामांना विविध योजनांच्या माध्यमातून ५० कोटी , ३७ लक्ष रु . इतका निधी उपलब्ध करुन खर्च करण्यात आला
त्यात आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातुन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडुन खास बाब म्हणून १० कोटी रुपये विशेष निधी, जिल्हा नियोजन कमिटी ( नगरोत्थान )मधून ९ कोटी, दलित वस्ती व आदीवासी उपाययोजना मधून २ कोटी १२ लक्ष, नवनिर्मीत नगरपंचायत ( जिल्हा / राज्यस्तर ) ३ कोटी ६८ लक्ष,विशेष रस्ता अनुदानसाठी ३ कोटी,नगरपंचायत निधी / विकास शुल्क १ कोटी ४५ लक्ष, विविध वैशिष्टपुर्ण योजना १२ कोटी १० लक्ष, घरकुले अनुदान १ कोटी,शौचालय अनुदान १ कोटी २७ लक्ष ५० हजार,विद्युत उपकरणे ( स्ट्रिटलाईट , हायमास्ट व इ . ) २ कोटी ९० लक्ष, स्वच्छता अंतर्गत उपकरणे १९ लक्ष,स्वच्छता विभाग वाहने ( कचरागाडी ) ९२ लक्ष, अग्नीशमन बंब ८५ लक्ष,सांडपाणी व्यवस्थापन ६८ लक्ष, राज्यसभा खासदार निधीतून खासदार हुसेन दलवाई ३० लक्ष, खासदार डि . पी . त्रिपाठी ५० लक्ष,खासदार सुब्रमण्यम स्वामी ५० लक्ष निधी प्राप्त झाला.या निधीच्या माध्यमातून कळवण शहरात केलेल्या विकास कामांचा निधीसह लेखाजोखा मांडण्यात आलेला आहे. तर विकासकामांच्या छायाचित्र व कात्रणांची रेलचेल आहे.
आमदार नितीन पवार, कळवण नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड शशिकांत पवार यांचे मनोगत देण्यात येवून जनतेचे लक्ष वेधण्यात आले आहे. कळवण शहर व तालुका महाविकास आघाडीने या पुस्तिकेद्वारे केलेल्या विकास कामांचा ऊहापोह केला असतांना विरोधक आता आपला निशाणा कशा पद्धतीने सत्ताधारी पक्षांवर साधणार आहेत याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.