कळवण- कळवण पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानूर पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ. मनीषा योगेश पवार यांची आज सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात झाली. आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता आहे.
विद्यमान सभापती सौं. मीनाक्षी चौरे यांनी आवर्तन पध्दतीने सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.सभापतीपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असून पंचायत समितीमध्ये सदस्य असलेल्या अन्य महिलांनी सभापतीपदावर काम करण्याची संधी आमदार नितीन पवार यांनी यापूर्वी दिली आहे. मानूर गणाच्या सदस्या सौं. मनीषा पवार यांचे आवर्तन नुसार सभापतीपदावर हक्क असल्यामुळे निवडणुकीचा शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आला .
सभापतीपदासाठी सौ. मनीषा पवार यांनी दोन नामनिर्दर्शनपत्र दाखल केले. त्यांच्यावर काँग्रेसच्या सौ. पल्लवी देवरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे लालाजी जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार बी. ए. कापसे व सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी डी. एम. बहीरम यांनी काम पहिले. कळवण पंचायत समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. मनीषा पवार यांचा निर्धारित वेळेत एकमेव दोन अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी. ए. कापसे यांनी सभागृहात केली.
सभापती निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. जयश्री पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती सौ मनीषा पवार यांचा सत्कार करण्यात आला. निवडीप्रसंगी सभागृहात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं. जयश्री पवार,जिल्हा परिषदेचे गटनेते यशवंत गवळी, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार,बाजार समितीचे सभापती धनंजय पवार,पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माजी सभापती लालाजी जाधव, सौ पल्लवी देवरे, सौ आशाताई पवार,जगन्नाथ साबळे, सौ मीनाक्षी चौरे,सोमनाथ पवार,मधुकर गायकवाड, रामदास पवार, कडू पाटील, रामचंद्र गायकवाड, भावराव महाले, नारायण पवार, पोपट पवार, यशवंत महाले आदींसह तालुक्यातील बहुसंख्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वाना विश्वासात घेणार –
माझ्या सारख्या सर्वसामान्य आदीवासी महिलेला सभापतीपदाची संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व आमदार नितीन पवार यांनी न्याय दिला आहे. तालुक्यातील विकासकामे करतांना सर्वाना विश्वासात घेऊन कामकाजात सहभागी करुन घेऊ
– सौ मनीषा पवार
सभापती पंचायत समिती कळवण