कळवण – समाजातील निराधार,निराश्रित वृध्द नागरिकांना नवीन कपड्यांची अनोखी भेट देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि समाधानाची छटा उमटवत कळवण तालुका पत्रकार संघाने अनोख्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा करत सामाजिक बांधिलकी जोपासून आत्मीयतेचे दर्शन घडवले. पत्रकार दिनानिमित्त कळवण तालुक्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या निराधार वृध्द व्यक्तींना नवीन कपडे भेट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे,सप्तशृंगी वृद्धाश्रमचे संस्थापक गंगा पगार उपस्थित होते. जेष्ठ नेते रविंद्र देवरे यांनी सांगितले की,कळवण तालुका मराठी पत्रकार संघाने राबवलेला हा उपक्रम सर्वार्थाने सामाजिक जाणीव असलेला व समाजातील अनेक घटकांना चांगल्या कामाची दिशा देणारा असून निराधार वृद्ध व्यक्तिंप्रती संवेदना जपत कळवण तालुका पत्रकार संघाने सामाजिक भावना दृढ केली असून हे कार्य कौतुकास्पद असल्याचे देवरे यांनी सांगितले.
यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक,निराधार अपंग व्यक्ती,वृध्द महिला यांना नवीन कपडे व साड्या भेट देण्यात आले.
कार्यक्रमास पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस मनोज देवरे,नंदकुमार खैरनार ,तालुकाध्यक्ष रविंद्र पगार,कार्याध्यक्ष राकेश हिरे,रविंद्र बोरसे,दीपक महाजन,डॉ.किशोर कुवर,शशिकांत खैरनार, किरण मालपुरे,किरण सुर्यवंशी,किरण अहिरे,तुषार बर्डे,निलेश कदम,लक्ष्मीकांत पाठक,वसंत आहेर,दीपक आहेर,योगेश बागुल, विजय वाघ, युवराज वाघ आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन राकेश हिरे यांनी केले.काशिनाथ गायकवाड यांनी आभार मानले.