आरकेएम शाळेच्या माध्यमातून क्रीडा प्रेमींना सुविधा मिळणार
…
कळवण – २०११ पासून दुर्लक्षित असलेले तालुका क्रीडा संकुल नादुरावस्थेत होते त्याची आमदार नितीन पवारांनी दुरुस्ती करुन तालुका क्रीडा प्रेमींना सुविधायुक्त केले. भविष्यातील देखभाल व सुविधायुक्त ठेवण्यासाठी आमदार नितीन पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यानी तालुका क्रीडा संकुल कळवण शिक्षण संस्थेकडे हस्तांतरित केले असून नुकतेच त्याचे हस्तांतरण झाले.
तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक संपन्न होऊन बैठकीत क्रीडा संकुल कळवण शिक्षण संस्थेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कळवण शिक्षण संस्था यांच्यात लेखी करारनामा होऊन तहसीलदार कार्यालयात तालुका क्रीडा संकुलचे कार्याध्यक्ष तहसीलदार बी ए कापसे यांनी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड शशिकांत पवार यांच्याकडे करारनामा संदर्भातील कागदपत्रे सुपूर्द करुन क्रीडा संकुल हस्तांतरित करण्यात आले.
कळवण तालुक्यातील खेळाडूंना विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी माजीमंत्री कै. ए. टी. पवार यांनी नाकोडे येथे तालुका क्रीडा संकुल उभे केले. त्याची अवस्था दयनीय झाल्याचे पाहुन आमदार नितीन पवार यांनीच संकुलाला उर्जितावस्था आणून रुप देण्याचा निर्धार केल्यामुळे २० लाख रुपयांच्या निधीतून दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घेण्यात येऊन दोन महिन्यात दुरुस्ती केली गेली. इंनडोअर हॉल, कार्यालय इमारत, व्यायामशाळा हॉल, विविध खेळांचे मैदान काम पूर्ण करण्यात येऊन ग्रीनजिम बसविण्यात आली.७ सप्टेंबर २०२० रोजी आमदार नितीन पवार यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
तालुका क्रीडा संकुल हस्तांतरण व करारनामा प्रसंगी यावेळी कळवण शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र भामरे, भूषण पगार,तालुका क्रीडा अधिकारी ढाकणे, महेंद्र पाटील, अभय कजगावकर, क्रीडा शिक्षक डी.जे. पवार,ए. के. शेवाळे, श्रीमती मंगला पगार, पूजा धांडे आदी उपस्थित होते
लोकाभिमुख निर्णय —
तालुका क्रीडा संकुले उभारण्याचा सरकारचा उद्देश चांगला आहे. परंतु, ती बांधल्यानंतर सांभाळायची कुणी, याबाबत विचारच केला गेला नसल्याने जी संकुले तयार आहेत, त्यांची दुरवस्था झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने क्रीडा संकुले बांधून निधी खर्च करून मोकळे झाले. त्यामुळे ही संकुले बऱ्याच कालावधीपासून ओस पडली. नाकोडा येथील क्रीडा संकुलाची दुरुस्ती करुन हे संकुल सांभाळण्याची जबाबदारी कळवण शिक्षण संस्थेला देण्याचा लोकाभिमुख निर्णय आमदार नितीन पवार व क्रीडा समितीने घेतला.
शासन धोरण आणि क्रीडांगण –
जिल्ह्याप्रमाणेच तालुक्यातील खेळाडूंनाही अद्ययावत क्रीडांगण मिळावे, त्यांना क्रीडाविषयक सर्व पायाभूत सुविधा मिळाव्या, या उदात्त हेतूने प्रत्येक तालुक्यात एक कोटी रुपये निधीतून तालुका क्रीडा संकुल उभारण्याचे शासनाने निश्चित केल्याने नाकोडे येथे शासकीय वसतिगृहासमोर विस्तीर्ण जागेत गट नंबर १ मधील १.५० हेक्टर जमिनीवर संकुल साकारले आहे. मैदान सपाटीकरण, २०० मीटरचा ट्रॅक, कंपाउंड वॉल, कार्यालय, स्टोअर रूम, चेंजिंग रुम्स, टॉयलेट, इनडोअर मल्टिपर्पज हॉल, बास्केटबॉल मैदान, अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था आदी व्यवस्था करण्यात आली आहे.