अत्यावश्यक सेवा वगळल्या उपसरपंच विनोद खैरनार यांनी घेतला निर्णय
कळवण – कळवण तालुक्यातील नवीबेज गावात कोरोना बाधितांची संख्या २४ पर्यंत पोहचल्यामुळे स्थानिक पदाधिकारी व प्रशासन यांनी नवीबेज गावात तीन दिवस लॉकडाउन जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती उपसरपंच विनोद खैरनार, कोरोना समितीचे अध्यक्ष घनश्याम पवार यांनी दिली.
नवीबेज गावात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीस २०० रुपये दंड आकारण्यात येणार असून ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासन यांनी लॉकडाउन करण्याच्या निर्णयाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात करोनाचा जोर पुन्हा वाढल्याचं चित्र असल्यानं सध्या चिंतेचं वातावरण आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार की काय अशी चर्चा सुरू असताना कळवण तालुक्यातील नवीबेज गावात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी नवीबेज गावातील नागरिकांची कोरोना चाचणी नवीबेज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ काटे यांनी घेतली त्यात २४ जण बाधित आढळून आले असून गेल्या काही दिवसांपासून नवीबेजमध्ये करोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोरोना समिती,तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक,यांनी संयुक्त रित्या बैठक घेऊन लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीबेज गावात चौक,पार ,कट्टा,व सार्वजनिक ठिकाणी बसण्यावर निर्बध घालण्यात आले असून कामा व्यतिरिक्त कोणीही गावात फिरु नये, घरातून बाहेर पडतांना विना मास्क फिरल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे,ताप अथवा सर्दी खोकला जाणवत असल्यास त्यांनी नवी बेज आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करून घ्यावी, नवीबेज गावातील सर्व किराणा दुकानदार ,चिकन शॉप,भाजी विक्रेते, व्यावसायिक यांनी कोरोना चाचणी करुन चाचणी अहवाल दुकानाबाहेर लावावा, तपासणी न केलेल्या व्यावसायिकाचा व्यवसाय बंद केला जाईल असा निर्णय नवीबेज प्रशासकीय यंत्रणेने घेतला आहे.
….