कळवण – कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कडक निबंध लावण्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सोमवारपासून अंशत : लॉकडाऊन लावण्यात आला. सोमवारी सायंकाळी मात्र खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली. दुकानदारांची मात्र काहीशी धावपळ झाली. आज मंगळवारी मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानें सुरु असल्याचे समजताच मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल प्रशासनाची करडी नजर दुकानावर पडली आणि काही वेळात दुकानें बंद झाली.या निर्बधाचा परिणाम छोटया व्यावसायिक व हॉटेल व्यवसायावर झाल्याने त्यांनी नाराजी बोलून दाखवली.
सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल , असे निर्बध असतांना कळवण शहरात मात्र सोमवारी सायंकाळी 7 वाजेनंतरच अंमलबजावणी झाल्यामुळे अनेकांची खरेदी राहिली, दारु दुकानासमोर मात्र दारु खरेदीसाठी शेवट पर्यंत गर्दी दिसून आली.त्यानंतर मात्र रस्त्यावर दिसणाऱ्याना पोलीस स्टेशनच दर्शन घ्यावे लागले. कळवण पोलिसांनी शहरात फेरफटका मारुन नागरिकांना कडक सूचना केल्या. त्यामुळे निर्बंधाची कळवण शहरात कडक अंमलबजावणी होईल असे पोलिसांच्या अकॅशन मोडवरुन कळवणकरांना दिसून आले.
अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत परंतु निर्बंध सोमवारी रात्रीपासून लागू होणार की फक्त शनिवारी , रविवारी असणार याविषयी व्यवसायीक व नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाला होता. राज्यात निर्बध लावताना लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर दिला आहे या निर्बधामुळे छोटे व्यावसायिक व हॉटेल व्यवसायावर पुन्हा संक्रात कोसळल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.
कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आहेर,उमेश राठोड, योगेश पगार,बापू निकम, दत्ता जाधव, विनोद केदारे, विनोद निकम यांच्या पथकाने अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लसीकरण पूर्ण केले आहे, कोरोना चाचणी केली आहे का ? चाचणी अहवाल दर्शनी भागात लावला आहे का ? दुकानदार स्वत : व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही याची पाहणी करुन सूचना केल्या. अत्यावश्यक वगळता अन्य दुकानें बंद केली.
निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणच्या पोलीस यंत्रणा उभी करुन नागरिकांना मास्क घालण्यासाठी सक्ती केली शिवाय समाज प्रबोधन करून नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस करीत आहेत , तर दुसरीकडे अनावश्यक फेऱ्या मारणाऱ्यावर कारवाई करून समज देण्यात येत आहे .रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांना मेनरोड रस्त्यावर नागरिकांची रेलचेल असल्याने रोजगार मिळत होता मात्र आता पुन्हा सरकारने दिवसा जमावबंदी व रात्री लॉकडाऊन केल्याने या छोट्या व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे .
प्रशासनाचे आवाहन
कळवण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे . सोशल डिस्टन्सिंग , मास्क यासह आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी . गर्दीत जाणे टाळावे , गर्दी होईल अशा कार्यक्रम , समारंभांचे आयोजन करु नये आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे . कोणाला काही लक्षणे जाणवत असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी , असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना तहसीलदार बी ए कापसे यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे.
……
पुन्हा लॉकडाऊनचीच स्थिती –
सलून व्यवसायाला बंदीचा सामना करावा लागणार असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन काळात अनुभवलेली परिस्थिती ओढवली आहे . त्यामुळे आर्थिक मंदीमुळे दुकानाचे भाडे आणि घरखर्च चालवणे जिकिरीचे बनणार आहे .
भगवान पगारे
सलून व्यावसायिक, कळवण
…….
हॉटेल व्यवसायाला घरघर-
राज्य सरकारने कोरोनामुळे संध्याकाळी 8 वाजता हॉटेल बंद करण्यास सांगितल्याने मोठा फटका बसला आहे . ग्राहक आठच्या नंतर जेवण्यासाठी हॉटेलला येतात . शनिवारी आणि रविवारी व्यवसाय करण्याचा चांगला दिवस असतो , पण या दोन्ही दिवशी कडक लॉकडाऊन लावल्याने व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे . –
परिमल पवार ,
हॉटेल व्यावसायिक, मानूर