पुढील वर्षी होणार निवडणूक, मोर्चे बांधणीला प्रारंभ
कळवण – येथील नगरपंचायतीच्या स्थापना काळातील संस्थापक समजल्या जाणाऱ्या पहिल्या कार्यकारणीचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपल्याने राज्य सरकारने कळवण नगरपंचायतीवर प्रशासक म्हणून कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या सहभाग संदर्भात प्रशासक हे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, विषय समिती सभापती यांच्या सल्लागार समितीशी सल्लामसलत करतील अशी राज्य सरकारची सूचना आहे.
कळवण ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्या नंतर नगरपंचायतची पहिली पंचवार्षिक निवडणूकींसाठी १ नोव्हेंबर २०१५ रोजी मतदान झाले होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या नगराध्यक्षा सौं सुनीता पगार ह्या बिनविरोध झाल्यामुळे १६ जागांसाठी ७४ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती त्यात राष्ट्रवादी काँग्रेस -१६, काँग्रेस-११, भाजपा -११, शिवसेना – ३, मनसे – ४, बसपा – २ व अपक्ष – २७ उमेदवार रिंगणात होते त्यात राष्ट्रवादी काँग्रेस -७ , भाजपा – ४, काँग्रेस – ३, शिवसेना -१ व अपक्ष २ उमेदवार विजयी झाले होते.
राष्ट्रवादी , काँग्रेस, शिवसेना व अपक्ष यांची मोट बांधून आमदार नितीन पवार व गटनेते कौतिक पगार यांनी २०१५ मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग कळवण शहरात करुन नगरपंचायतमध्ये सत्ता काबीज केली, २०१9 मध्ये राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांचा महाआघाडीचा प्रयोग झाला तेव्हा कळवणच्या आघाडीचा विषय जिल्ह्यात चर्चिला गेला. गेल्या ५ वर्षात नगरपंचायतला ३ नगराध्यक्षा,१० उपनगराध्यक्ष व ८ स्वीकृत नगरसेवक, ३ मुख्याधिकारी लाभले.
कळवण नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपल्याने नगरपंचायतवर प्रशासक म्हणून कळवणचे सहाय्यक अधिकारी विकास मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारी महिन्यात पंचवार्षिक निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली असून . निवडणूक पार पडून नगराध्यक्ष निवड होईपर्यंत ते कार्यभार सांभाळतील.
कळवण नगरपंचायतच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणूकींचे वेध इच्छुकाना लागले असून प्रभागानुसार आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षण व प्रभागरचनेवर हरकतीची मुदतही २६ नोव्हेंबर रोजी संपली असून एक हरकत नोंदवली गेली आहे मात्र ती फेटाळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
कळवण नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२१चा बिगुल वाजला असून, या निवडणुकीत शहरातील सर्व १७ प्रभागात राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना, भाजपा, मनसे, माकप या राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून इच्छुकांनी प्रभागाची शोधाशोध करुन काम सुरू केले आहे.