कळवण – कळवण तालुक्यात सध्यस्थितीत विद्युत पुरवठा हा सकाळी ७.१५ ते दुपारी ३.१५ तसेच रात्री ९.१५ ते सकाळी ७.१५ वाजेपर्यंत खंडीत करुन वीज भारनियमन सुरु आहे. सध्या कांदा लागवड सुरु असल्यामुळे कळवण तालुक्यात विद्युत पुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरळीत सुरू ठेवा अशी मागणी कळवण तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष महेंद्र हिरे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र हिरे समवेत शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, तालुकाप्रमुख अंबादास जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती बळीराम देवरे, रामा पाटील, संजय रौंदळ यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन देत कळवण तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली.कळवण तालुक्यातील वीज पुरवठा संदर्भात काँग्रेस व शिवसेना पदाधिकारी यांची मागणी लक्षात घेऊन महावितरणच्या यंत्रणेशी बोलून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन नामदार भुसे यांनी दिले.
निवेदनात नमूद केले आहे कीं, कळवण तालुक्यात कांदा हे मुख्य पिक असुन कांदा पिकाचे क्षेत्र जवळपास ४३, १०० हेक्टर इतके असुन कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते व आंतरराष्ट्रीय बाजारात कळवण तालुक्यातील कांदा निर्यात केला जातो . त्यामुळे सध्या तालुक्यात कांदा पिकाची लागवड सुरु असुन त्यासाठी लागणारे मजुर हे सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान उपलब्ध असतात त्यामुळे कांदा रोपास लागवड होताना पाणी देणे आवश्यक असते . यादरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत उपलब्ध नसल्याने कांदा लागवड करण्यास अडचणी निर्माण होत आहे. कांदा लागवडीचे सत्र हे १५ जानेवारी पर्यंत आहे मागील अनेक वर्षाच्या या कालखंडात अशा स्वरुपाचे विद्युत भारनियम करण्यात आलेले नाही परंतु सध्यस्थितीत कळवण तालुक्यात करण्यात आलेले भारनियम रद्द करून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विद्युत पुरवठा सुरु करावा अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी निवेदनात नमूद केली आहे.