कळवण – बाजारामध्ये ज्या बाबीची मागणी असेल, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी पीक घ्यावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून कळवण तालुक्यातील दरेगाव वणी व कोल्हापूर फाटा ( कळवण) येथील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांसाठी उपलब्ध देण्यात आला.
विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील तसेच ग्राहकांना दर्जेदार, ताजा भाजीपाला वाजवी दरामध्ये उपलब्ध होणार असल्याने या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार नितीन पवार यांनी यावेळी केले. संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान अंतर्गत कळवण तालुक्यात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाला सुरुवात करण्यात आली.महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मौजे दरेगाव वणी व कोल्हापुर फाटा (कळवण) येथे रविवारी या अभियानाला कळवण तालुक्यात प्रारंभ झाला. हे अभियान तालुक्यात यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश आमदार नितीन पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यात १०० विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे भाजीपाला विक्री केंद्र विकेल ते पिकेल या उपक्रम अंतर्गत राबविले जाणार आहेत अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांनी यावेळी दिली.
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत स्थापन वाघदेव शेतकरी बचत गट तसेच दरेगाव वणी येथील महीला शेतकरी यशोदाबाई संतु गवळी यांनी व इतर शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला असून कळवण तालुक्यात १०० ठिकाणी थेट विक्री करण्याचे नियोजन केलेले आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल स्वतः विक्री केल्याने शेतक-यांना नक्की फायदा होईल त्यामुळे या योजनेचा तालुक्यातील शेतक-यांनी लाभ घ्यावा आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी डॉ के पी खैरनार यांनी यावेळी केले.
विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत केंद्राच्या उदघाटनप्रसंगी कौतिक पगार, राजेंद्र भामरे,रवीद्र देवरे,संतोष देशमुख तसेच कृषि विभागातील डॉ. के पी खैरणार उपविभागीय कृषि अधिकारी कळवण,श्री.विजय पाटील तालुका कृषि अधिकारी कळवण ,सर्व मंडळ कृषि अधिकारी,कृषि पर्यवेक्षक ,कृषि सहाय्यक ,आत्मा कर्मचारी उपस्थित होते.