कळवण – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात यंदा अतिशय साध्या पध्दतीने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आदिवासी बांधवांनी जागतिक आदिवासी दिन साजरा केला. महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, कळवण तालुका आदिवासी संघर्ष समिती आणि विविध आदिवासी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अभोणा, चणकापुर,नांदूरी,वंजारी,अंबिका ओझर,साकोरे,आठंबे, इन्शी आदी गावात आदिवासी क्रांतिकारकांचे प्रतिमापुजन करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार नितीन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. चणकापूर येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली.
आदिवासींच्या गुणांचा गौरव व्हावा, त्यांना त्यांच्या हक्काची, कर्तव्यांची जाणीव व्हावी या मुख्य उद्देशाने संयुक्त राष्ट्राने घोषित केल्यापासून शासकीय स्तरावर व प्रामुख्याने आदिवासी बहूल भागात ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या साजरा करण्यात येतो. चणकापूर येथील समारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानचे अध्यक्ष प्रा.अशोक बागुल, जयवंत गारे, डॉ. जगदीश चौरे, काशिनाथ बागुल, एस टी बागुल आदी वक्त्यांनी मार्गदर्शन केले. तर, कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड, ज्ञानदेव पवार, आदिवासी बचाव अभियानचे कार्याध्यक्ष के के गांगुर्डे, भरत चव्हाण, संजय खिल्लारी, प्रभाकर बागुल, शांताराम बागूल, नामदेव थैल, सुरेश ढुमसे, सुर्यभान पवार, सुनिल पवार आदी उपस्थित होते.