– क्या जनावरांची तहान भागवायची कशी ?
– वीज पुरवठा खंडीत करु नका – देविदास पवार
कळवण – शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याने कळवण तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. वीज तोडल्याने त्याचे पडसाद मुक्या प्राण्यावरही उमटत आहे. रोहित्रावरील वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे मुक्या जनावरांची तहान भागवायची कशी असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करु नका व कळवण तालुक्यात जळगांवची पुनरावृत्ती होऊ देऊ नका असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महावितरण कंपनीने जिल्ह्यात वीजतोडणी सुरू केली असून त्याचे पडसाद उमटत आहे. वितरण रोहित्रावरील वीजपुरवठा खंडीत केला जात असल्यामुळे मुकी जनावरांची तहान भागवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे कंपनीने वीज पुरवठा खंडीत करु नये अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. महावितरण कंपनीच्या वीजबिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे . त्यासाठी कंपनीचे कर्मचारी थेट रोहित्राचा वीजपुरवठा खंडीत करीत आहेत . गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असल्याने कंपनीचे कर्मचारी थेट वीजजोडणी तोडत आहेत . याचा परिणाम शेतीच्या पिकावर होत आहे.
नैसर्गिक वातावरण बघता कांदा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे अशा या अस्मानी संकटाबरोबरच आता हे वीजजोडणी तोडण्याचे सुलतानी संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. पाणी असून वीज नसल्याने पाणी देता येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी नेते देविदास पवार यांनी केली आहे.
हल्ली बहुतांश शेतकऱ्यांकडे किमान म्हशी, बैल, गाय, बकऱ्या अशी जनावरे आहेत . यामध्ये दुधाळ जनावरांचा समावेश आहे . अशा जनावरांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे . यातील अनेक जनावरे दुभती तर आहेतच , पण काही जनावरे गाभण असतात . अशा जनावरांना वेळेवर पाणी मिळणे आवश्यक आहे . मात्र सध्या वीज कंपनीकडून वीजतोडणीची मोहिम केली जात असल्याने अनेक मुकी जनावरे तहानाने व्याकूळ होऊ लागली आहेत . त्यामुळे अशा जनावरांसाठी कंपनीने किमान वीज पुरवठा सुरळीत द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .
निदान माणुसकीच्या नात्याने –
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणे . त्यांना वीजबील भरण्यासाठी प्रवृत्त करणे. असे प्रकार व्हायला पाहिजेत. थेट वीजपुरवठा खंडीत करण्याच्या ऐवजी अनेक शेतकरी बिल भरण्यास तयार असतात. मात्र कंपनीच्या अशा भूमिकेमुळे ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यात उन्हाचा कडाका वाढल्याने जनावरांच्या घशाला कोरड पडत आहे. माणुसकीच्या नात्याने किमान जनावरासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत .