कळवण : कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे चोरांनी आपला मोर्चा चाळीतील कांद्याकडे वळविल्याने नवीबेजच्या देवरे वस्तीवर बुधवारी झालेल्या कांदाचोरीचा तपास कळवण पोलिसांनी अवघ्या २४ तासात शिताफीने लावून चौघांना पीक अप वाहनासह ताब्यात घेतले असून कळवण पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसमादे पट्ट्यातील कांदा चोरीत या चौघांचा संबंध असल्याची दबक्या आवाजात चर्चा असून देवरे वस्ती परिसरात गेल्या काही दिवसापासून झालेल्या चोरी प्रकरणात ह्या चौघांचा हात असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे चोरी संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा ह्या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले
कळवण येथील राजकुमार दशरथ देवरे यांची नवीबेज व भेंडी शिवारात शेती आहे. भेंडी शिवारातील चाळीत कांद्याची साठवणूक केली आहे त्यातून २५ क्विंटल कांदा चोरीला गेल्याची श्री देवरे यांनी बुधवारी कळवण पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी कांदा चाळ, वाहतूक मार्ग पाहणी करुन पीक अप वाहनातून व माहितगार व्यक्तीकडून चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला होता.
बुधवारी दुपारी जुनी भेंडी चौफुलीवरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी तपासले मात्र काही निष्पन्न निघाले नाही, भेंडी गावातून वरवंडी मार्ग मंगळवारी रात्री पीक वाहन गेल्याची आणि तेच वाहन बुधवारी दुपारी वरवंडी शिवारात मळ्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना मिळाली, माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचा सापळा रचला त्यात वाहतूक पोलीस सचिन राऊत यांना भेंडी ते वरवंडी रस्त्यावर गस्तीवर पाठविल्यानंतर त्यांना पीक अप भेंडी गावाकडे येत असल्याचे आढळून आले. राऊत यांनी पीक अप वाहन चालकाकडे चौकशी केले असता शेणखत घेण्यासाठी गेलो असल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यातून त्यांना संशय आल्याने कळवण पोलीस स्टेशनला पीक अप आणल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर वाहन चालक राजेंद्र देवरे याने राजकुमार देवरे यांच्या कांदा चाळीतून चौघांनी कांदा चोरी केली आणि पिंपळगाव बसवंत येथे कांदा विकल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता वाहन चालक राजेंद्र तुकाराम देवरे यांच्यासह गोविंदा कृष्णा चिंधे, खुशाल भिका पवार, जगन मोतीराम जाधव हे कांदा चोरीत सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. कांदा चोरी प्रकरणी चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी वाय बोरसे, संदीप बागूल पुढील तपास करीत आहे.
डॉ दिघावकर यांच्याकडून कौतुक –
कसमादे पट्ट्यातील व देवरे वस्तीवरील कांदा चोरीबाबत नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ प्रताप दिघावकर यांनी मंगळवारी विचारणा केल्यानंतर बुधवारी कळवण पोलिसांच्या या विशेष कामगिरीमुळे डॉ दिघावकर यांनी कळवण येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचा सत्कार करून कळवण पोलीस कर्मचारीचे विशेष कौतुक केले आहे.
वरवंडी येथे लावले शेण –
कांदा चोरी प्रकरणातील गोविंदा चिंधे याला पैशाची गरज असल्यामुळे कांदा चोरी करण्याचे वाहन चालक राजेंद्र देवरे याने नियोजन केले, उर्वरित तिघांना सामावून घेतले. देवरे यांच्या चाळीतून कांदा गोणीत भरण्यात येऊन पिंपळगाव बसवंत येथे प्रभाकर चव्हाण नावाने कांदा विक्री केली. चोरीपूर्वी गोणीत कांदा कोणी भरला हा प्रश्न अनुत्तरित असून कांदा विक्री केल्यानंतर वाहन चालक देवरे याने वरवंडी शिवारात एका मळ्यात गाडीला शेण लावले आणि गाडी शेणखत घ्यायला गेली होती असा देखावा दाखविण्याचा प्रयत्न केला मात्र देवळा येथे गाडीला शेण नसल्याचे पुरावे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे असल्यामुळे वाहन चालक देवरे पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला.