अत्यावश्यक सेवा वगळल्या महिला सरपंच, उपसरपंच यांनी घेतला निर्णय
कळवण – कळवण तालुक्यातील जुनीबेज गावात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे स्थानिक पदाधिकारी व प्रशासन यांनी तीन दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून २३ मार्च पासून २६ मार्च पर्यंत लॉकडाउन असणार आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सरपंच सौं अहिल्याबाई एडाईत, उपसरपंच सौं वैशाली अहिरे यांनी दिली.
जुनीबेज गावात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीस २०० रुपये दंड आकारण्यात येणार असून ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासन यांनी लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात करोनाचा जोर पुन्हा वाढल्याचं चित्र असल्यानं सध्या चिंतेचं वातावरण आहे. राज्यात पुन्हा लॉकडाउन लागू होणार की काय अशी चर्चा सुरू असताना कळवण तालुक्यातील जुनीबेज गावात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारपासून शुक्रवार पर्यंत चार दिवसासाठी संपूर्ण जुनीबेज गाव बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच व उपसरपंच या दोघा महिलांनी घेतला आहे.
मंगळवारी जुनीबेज गावातील नागरिकांची कोरोना चाचणी नवीबेज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ काटे यांनी घेतली त्यात सात जण बाधित आढळून आले असून यापूर्वी गावातील १३ जण कोरोना बाधित म्हणून आढळून आले आहे.गेल्या काही दिवसांपासून जुनीबेजमध्ये करोना बाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक यांनी संयुक्त रित्या बैठक घेऊन लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुनीबेज येथे १८ विनामास्क असलेल्या व्यक्तींकडून ३६०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.