कळवण – दि कळवण मर्चंट को ऑप बँकेच्या तक्रार निवारण व तडजोड समितीच्या अध्यक्षपदी श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मोतीराम अर्जुन पगार यांची निवड करण्यात आली. कमको बँकेच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच बँकेचे अध्यक्ष सुनील महाजन अध्यक्षेतेखाली संपन्न होऊन त्यात ९७ व्या घटना दुरुस्ती व आदर्श पोटनियमनुसार नागरी सहकारी बँकेस तक्रार निवारण व तडजोड समिती नियुक्त करणे बंधनकारक असल्यामुळे समिती गठीत करण्यात येऊन समितीच्या अध्यक्षपदी बँकेचे सभासद व शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मोतीराम पगार यांची निवड संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. पगार हे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख, श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष असून श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम बघत आहे. बँकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी नेहमी प्रश्न उपस्थित करुन वाचा फोडली, उद्योग व्यवसायात त्यांचा तडजोडीचा अनुभव लक्षात घेऊन कमकोचे सभासद आणि बँक यांच्यामध्ये वेळोवेळी निर्माण होणारे वाद, कर्जदार व ठेवीदार यांच्या तक्रारी यांचे निराकरण करण्यासाठी तसेच बँकेचे थकबाकीदार आणि बँक यांच्यामधील वाद मिटविण्यासाठी व तडजोड करण्यासाठी तक्रार निवारण व तडजोड समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक मोतीराम पगार यांची निवड करण्यात आली आहे. पगार यांच्या नियुक्तीबद्दल शहरातील विविध संस्था व संघटना यांनी त्यांचा सत्कार केला.