कळवण – शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी कळवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने १ ते १० मार्च या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली असून कळवण शहरात शिवाजीनगर, संभाजीनगर, गणेशनगर, रामनगर परिसरात ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सर्व्हेशन केले जात असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांनी दिली.
पोटाची खळगी भरण्यासाठी होणारे पालकांचे स्थलांतर, कौटुंबिक परिस्थिती, पालकांचे अज्ञान, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे . त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या ( आरटीई ) प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसले आहे .
शाळाबाह्य मोहिमेसाठी कळवण पंचायत समिती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद मराठी शाळा संभाजीनगर, शिवाजीनगर, रामनगर, गणेशनगर शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक कळवणच्या आर. के. एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांची मदत घेऊन शाळा बाह्य सर्वेक्षण केले जात असून कळवणकराकडून मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून शिक्षण विभागाकडून प्राप्त सर्वेक्षण फॉर्ममध्ये सविस्तर माहिती नागरिकडून दिली जात असल्याची माहिती संभाजीनगरचे मुख्याध्यापक परमेश्वर खैरनार यांनी दिली.
संभाजीनगर येथे ३५० हून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून शाळाबाह्य मुलांचे कुटुंब सर्वेक्षणाचे गटप्रमुख परमेश खैरनार, आर के एम विद्यालयातील शिक्षक एकनाथ जगताप, आशा साळवे, विजय शिरसाठ, भावना पगार, सुनीता आहेर , सोनाली गांगुर्डे ,अरुणा गावित ,धनश्री गांगुर्डे, अनिल सोनवणे ,नरेंद्र पवार, हिरालाल गावित ,भाऊ पाटील, पंडित वाघ ,दत्तात्रय गावित ,आश्लेषा आहेर आदी सर्वेक्षणासाठी परिश्रम घेत.
६ ते १४ वयोगटातील मुलांचा समावेश-
गजबजलेल्या वस्त्या , बसस्थानके , ग्रामीण भागातील बाजार , गावाबाहेरची पालं , वीटभट्या , मळा वस्ती , मोठी बांधकामे , स्थलांतरित कुटुंबे , झोपड्यापट्टी, भटक्या जमाती आदी विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर , ऊसतोड कामगारांच्या वस्त्या , शेतमळ्यांवरील पालकांची बालके , मागास , वंचित गटातील व अल्पसंख्याक गटातील वस्तीतील मुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. तीन ते सहा वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत . तसेच खासगी बालवाडी , इंग्रजी माध्यमातील ज्युनिअर केजी , सीनिअर केजीमध्ये जात नाहीत , अशा बालकांचाही शोध घेतला जाणार आहे . तसेच १८ वर्षांपर्यंतच्या दिव्यांग मुलांचा समावेश सर्वेक्षणात होणार आहे .