कळवण – सध्या आपण करोना महामारीचा सामना करीत आहोत.अनेकांना प्लाज्मा व ऐनवेळी रक्तदान न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागल्याचे अनेक उदाहरण डोळ्यासमोर आले आहेत. यामुळे शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून या अनोख्या अशा प्लाज्मा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कळवणच्या श्री धनलक्ष्मी पतसंस्था, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री विठ्ठल फाऊंडेशन ग्रुप ऑफ कळवण,लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय विश्वस्त मंडळ तसेच स्थानिक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आयोजित या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
काळाची गरज ओळखून कळवण शहर व तालुक्यातील सर्व गणेश मंडळ,त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते,सर्व शासकीय,निमशासकीय कर्मचारी, शाळा,महाविद्यालयीन विद्यार्थी,विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ,सर्वच सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक भान जपणाऱ्या सर्वच घटकांना कळकळीची विनंती आहे की, आपल्या एका कृतीमुळे आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो. करोना होऊन सहीसलामत बाहेर पडून महिना व त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या व्यक्तीला प्लाज्मा देण्याची संधी या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दातृत्व गुण जोपासणाऱ्या सर्वच कळवणकर बंधू भगिनींना या निमित्ताने प्लाज्मा व रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. हे शिबीर यशस्वी करतांना सर्व शासकीय व कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. टप्याटप्याने दात्यांना निमंत्रित करण्यात येणार असून,नियोजनाच्या दृष्टीने सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत संबंधितांनी टप्याटप्याने रक्तदान शिबिरात सहभागी व्हायचे आहे.
लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय, कळवण येथे या शिबिर होत आहे.या बाबत आयोजन प्रमुख दीपक महाजन,कृष्णा बापू पगार,राजेंद्र मालपुरे, किरण अमृतकार,नामदेव पगार,संजय पगार,चंद्रकांत बुटे,संजय वालखेडे, डॉ मंजरी आहेर,रेखा सावकार,शालिनी कोठावदे आदींनी केले आहे.
प्रबोधनकारांना संधी–
सोशल मीडियावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या प्रबोधनकारांना या शिबिरानिमित्ताने रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली असून त्यांना विशेष आवाहन करण्यात आले आहे.