कळवण – केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात व दिल्लीतील शेतकरी आंदोलनास कळवणमध्ये सर्वपक्षीय बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, छावा, व्यापारी महासंघ, कांदा उत्पादक संघटना, माथाडी कामगार यांनी कळवण बंदचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी व व्यावसायिक बांधवानी १०० टक्के बंदमध्ये सहभाग घेतला आहे. कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कळवण, नाकोडा, अभोणा व कनाशी येथील आवारात कांदा व भुसार लिलावही बंद आहेत.
तहसीलदार बी ए कापसे यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. यावेळी बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, छावाचे तालुकाप्रमुख प्रदीप पगार, शेतकरी नेते गोविंद पगार, वसाका बचाव समितीचे निमंत्रक सुनील देवरे, रिपाईचे सुनील बस्ते, टिनू पगार आदी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कळवण बस स्थानकावर तालुक्यातील जमलेल्या विविध पक्षाच्या पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन कृषी विधेयक रद्द करण्याच्या घोषणा दिल्या. तसेच केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी भूषण पगार, जितेंद्र पगार, साहेबराव पगार, अतुल पगार, शांताराम जाधव, सोमनाथ सोनवणे, विनोद खैरनार विनोद मालपुरे, प्रल्हाद गुंजाळ, नाना देवरे, सचिन पगार, राजू पवार, रामा पाटील, अशोक जाधव, मोय्योद्दीन शेख, किशोर पवार, बंडू पगार, संजय रौंदळ, मुन्ना पगार आदी उपस्थित होते.