कळवण- कळवण पोलीस उपविभाग कार्यालयातील पोलीस हवालदार सुभाष शेवाळे यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून सर्वात्कृष्ट अपराध सिध्दी पुरस्कार घोषित झाला असून जिल्ह्यातील एका मोठ्या घटनेची चौकशी करुन तपास लावण्यात शेवाळे यांना यश आले आणि त्याची दखल घेऊन पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील १७ उत्कृष्ट तपास केलेल्या गुन्हयाची निवड केली असून निवड झालेल्या गुन्हयात वणी पोलीस स्टेशनमधील अल्पवयीन मुलीचा बलात्कार व खून केलेल्या गुन्हयाचा समावेश करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास कळवणचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डी.आर.पाटील व त्यांचे क्राईम रायटर पोलीस हवालदार सुभाष विठ्ठलराव शेवाळे यांनी केला होता. संबधीत अधिकारी व कर्मचारी यांनी अतिशय किचकट तसेच गुंतागुंतीच्या गुन्हयाचा उत्कृष्ट तपास करुन गुन्हयातील आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने गुन्हयातील आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली आहे.गुन्हयाचा उत्कृष्ट तपास केल्याबददल अधिकारी व कर्मचारी यांना अनुक्रमे १० हजार व ५ हजार रुपये रोख रुपयाचे बक्षिस जाहीर केले असून लवकरच सदर पुरस्काराचे वितरण अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांचे कार्यालयात होणार आहे.