कलाप्रेमी कादंबरीकार : प्रा. ना. सी. फडके
मराठी वाड्मयातील ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रसिद्ध कादंबरीकार प्रा. ना. सी. फडके यांचा आज दि. 22 ऑक्टोबर रोजी स्मृतिदिन त्यानिमित्त विशेष लेख…
आताच्या काळात जरा कुठे खुट असे वाजले तरी लगेच टीव्ही, मोबाईलसह सर्व समाज माध्यमांमध्ये लगेच बातमी दिसायला लागते. त्यातही संप किंवा मोर्चा अशा घटना घडल्या तर मग विचारायलाच नको, परंतु ही घटना आहे, सुमारे ८० वर्षांपूर्वीची म्हणजे १९३९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात मुंबईत कामगारांचा संप होता. सर्वत्र कडकडीत बंद होता. तेव्हा एक प्राध्यापक खास पुण्याहून मुंबईला संप बघण्यासाठी रस्त्यावर दिवसभर फिरत होते. त्या दुसरी घटना अशीच कोल्हापूर मधील आहे, त्यानंतरचीच महिनाभरानंतर शेतकऱ्यांचा करवीरनगरीत भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार होता. हा मोर्चा बघण्यासाठी पुन्हा तेच प्राध्यापक रस्त्यावर तासनतास उभे होते. आजच्या काळात काही लोकांसाठी फक्त मोर्चा किंवा संप ही टिव्हीवर बघण्याची गोष्ट झाली आहे , पण त्या काळी अशी काहीच साधने नव्हती. तेव्हा ते प्राध्यापक प्रत्यक्ष घटना स्थळी गेले होते. कोण होते ते सद्गृहस्थ ? ते होते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ना. सी. फडके…
प्रा. ना. सी. फडके यांचा जन्म दि. ४ ऑगस्ट १८९४ रोजी झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना वेगवेगळ्या विषयात लेखन करण्याची आवड निर्माण झाली. पुढे पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी एम.ए. चे शिक्षण पुर्ण केले आणि लगेचच एका महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयाचे अध्यापन सुरु केले. त्याकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्या घटनेत एखाद्या कथा , कादंबरीचे बीज शोधणे ही त्यांची हातोटी होती. कलेसाठी कला की, जीवनासाठी कला हा वाद सुरू असतानाच कलेसाठी कला ही आग्रही भूमिका मांडणारे फडके खरे तर मराठीतील ज्येष्ठ समीक्षक होते. परंतु सुमारे पन्नास ते साठ वर्षांपूर्वी मराठी वाड्मयात त्यांच्या कथा-कादंबऱ्या जास्त लोकप्रिय झाल्या. वीस ते पंचवीस नव्हे तर सुमारे ७५ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यात प्रामुख्याने जादूगार, दौलत अटकेपार, प्रवासी, अंजली, हाक, आसू आणि हासू आदींचा प्रामुख्याने उल्लेख होतो.
विशेष म्हणजे वर्षभरात ते एक ते दोन कादंबऱ्या लिहीत असत. याशिवाय ३०कथा संग्रह, ४ नाटके अनेक लघुकथा, टीकाग्रंथ, थोर पुरुषांची चरित्रे , काव्यसंग्रह या सर्व प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांच्या साहित्याचा त्याकाळी गुजराती, इंग्रजी, हिंदी, तमिळ भाषेत अनुवाद झाला. प्रा. फडके केवळ लेखक नव्हते, तर रत्नाकर या मासिकाचे संपादक होते. याशिवाय अनेक नियतकालिकात त्यांचे लेखन सुरू होते. त्यांना चित्रकला, संगीत आणि पर्यटनाची आवड होती. या कलाभ्रमंतीतून त्यांच्या लेखनाला एक प्रकारे माधुर्य प्राप्त झाले होते.
प्रा. फडके यांनी १९४० मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. फडके हे अंतर्यामी व्यक्तिवादी, कलावादी आणि सौंदर्यवादी आहेत, परंतु त्यांची लेखन शैली काळानुरूप बदलत राहिली, म्हणून ह. ना. आपटे किंवा वामनराव जोशी यांच्या कादंबऱ्यापेक्षा त्यांच्या कादंबरीचा बाज वेगळा वाटतो. त्या काळातील कोल्हटकर, खाडिलकर, केळकर, केतकर, वरेरकर, माडखोलकर आदींसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांपेक्षा प्रा. फडके हे पुढील पिढीचे आवडते लेखक आहेत आणि राहतील, असे खुद्द थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी नमूद केले आहे. फडके यांच्या मराठी बांधवांची सेवा कार्याचा गौरव करताना खांडेकर पुढे नमुद करतात की, फडके यांच्या इतका विविध कला संस्कार असलेला लेखक मराठीत विरळाच सापडेल . फडके यांनी केवळ मराठीतच नव्हे तर इंग्रजी भाषेतही विपुल लेखन केले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांच्या कादंबऱ्या आजही नववाचकांना भावतात. म्हणूनच त्यांना लोकप्रिय कादंबरी म्हटले जाते. माणूस जगतो कशासाठी ? अशी सुंदर कथा लिहिणाऱ्या या लेखकाचे दि. 22 ऑक्टोबर१९७८ रोजी निधन झाले.