नवी दिल्ली – कलम ३७० हटविल्यानंतर गेल्या तीन दशकांपासून हिंसाचाराने त्रस्त जम्मू-काश्मीरमधील लोक आता भयमुक्त वातावरणात शांततेत जीवन जगत आहेत. तसेच भूतकाळातील दहशतवादाच्या आठवणी लोक विसरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दहशतवादी मकबूल बट आणि अफझल गुरू यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांचे समर्थक करत असलेले बंदचे आवाहन कुचकामी ठरत आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने गृह विभाग याकडे एक शुभ संकेत म्हणून पहात आहे. कारण यापुर्वी दहशतवादी मकबूल बटच्या मृत्यूनंतर १९८४ पासून प्रत्येक वर्षी ११ जानेवारी रोजी त्याच्या पुण्यतिथीला जम्मू-काश्मीरमधील संपूर्ण बंद पाळल्या जात होता. तसेच २०१३ नंतर अफझल गुरूच्या पुण्यतिथी दिनानिमित्त ९ फेब्रुवारीलाही दरवर्षी असेच घडत होते.
यंदाही जेकेएलएफने ९ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली होती आणि हुर्रियत कॉन्फरन्सच्या नावाचे तुरळक पोस्टरही श्रीनगरच्या काही भागात प्रदर्शित करण्यात आले होते, पण त्याचा खोऱ्यात काही विपरित परिणाम झाला नाही.
सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या, परंतु खासगी वाहने सुरू होती. श्रीनगरमध्ये अनेक ठिकाणी दुकानेचे शटर बाहेर बंद दिसत असले तरी आतून दुकानदार नेहमीप्रमाणे ग्राहकांना वस्तू पुरवठा करत होते.
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील लोक आता आशा प्रकारे हिंसाचाराला कंटाळून गेले असून दहशतवादाचा भूतकाळ मागे ठेवून त्यांना पुढे जायचे आहे. कलम ३७० रद्द केल्या पासून पंचायत, ब्लॉक आणि जिल्हा विकास परिषद निवडणुका झाल्याने जम्मू-काश्मीरमधील लोकांत विश्वास निर्माण करण्यात सरकार यशस्वी झाले आहे.