पेटविली ज्ञानज्योत, झाला वटवृक्ष….
असा शिक्षणमहर्षी पुन्हा होणे नाही….
– मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार पत्रकार आहेत)
ही घटना आहे, सुमारे ९९ वर्षापूर्वीची. एकदा एक सद्गृहस्थ काही शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त बाहेरगावी निघाले होते. त्यांच्या खिशातून एक रुपया आणि सहा आणे पडले असावेत, परत आल्यावर रात्रभर ते हिशोब करत बसले. शेवटी दुसऱ्या दिवशी आपल्या हिशोबनीस विद्यार्थ्याला ते म्हणाले, माझ्याकडून पैसे हरवले गडया. पुढच्या वेळेस मी प्रवासाला जाताना तेवढी रक्कम कमी करून माझ्या खर्चातून वळती करून घे. त्या मुलासमोर एक पैशाचा हिशोब लागत नाही, म्हणून रात्रभर जागणाऱ्या संत एकनाथांची मूर्ती उभी राहिली असावी…
वास्ताविक पाहता तो महापुरुषच या शिक्षण संस्थेचा संस्थापक होता, संस्थेच्या उभारणीत पैशांची अडचण आली, तेव्हा या महापुरूषाने आपल्या पत्नीच्या गळ्यातील सौभाग्य अलंकार असलेले मंगळसूत्र गहाण ठेवून गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले होते. शिक्षण संस्थेचा कारभार चोख आणि पारदर्शी असला पाहिजे, असा त्याचा कटाक्ष होता. आजच्या काळातील अनेक शिक्षण संस्थांचा गैरकारभाराच्या घटना आपण ऐकतो किंवा वाचतो, तेव्हा वरिल घटना कदाचीत दंतकथा वाटू शकते, परंतू हे वास्तव आहे. असा हा महापुरुष म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील होत.
शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा हे त्रिवार आणि ती त्रिकालाबाधित सत्य आहे, असे म्हटले जाते. आजच्या काळात महाराष्ट्रातील सर्व शहरात शिक्षणाची मोठी सोय झाली आहे. खेड्यापाड्यात आणि दुर्गम आदिवासी भागात शाळा दिसून येतात. मात्र सुमारे सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वी वेगळी परिस्थिती होती. पुणे आणि मुंबई या दोन शहरातच फक्त शिक्षणाची खऱ्या अर्थाने सोय होती. राज्यातील हजारो खेड्यापाड्यात चांगल्या शाळा नसल्याने शिक्षणाचा गंध नव्हता. अशा काळात खेड्यांत शिक्षणाची ज्ञान ज्योत पेटवून मुलांना संस्कारित करण्याचे महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. काही कारणास्तव त्यांना फार शिकता आले नाही. मात्र गावोगावी शाळा उभारून गरिबांच्या मुलांच्या शिक्षणात त्यांनी खंड पडू दिला नाही. राजर्षी शाहू महाराज हे त्यांचे मार्गदर्शक तर महात्मा फुले आदर्श होते. त्यांच्या कार्याला महात्मा गांधी यांनी आशीर्वाद तर दिलेच परंतू आर्थिक मदत देखील दिली होती.
थोरामोठ्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेतलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म दि. 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा परिसरात कुंभोज या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील, तर आईचे नाव गंगूबाई होते. पायगोंडा पाटील महसूल खात्यात रोड कारकून असल्याने त्यांच्या नेहमी बदल्या होत असत. सहाजिकच भाऊराव यांचे शिक्षण वेगवेगळ्या गावी झाले आहेत. ऐतवडे बुद्रुक (जि. सांगली) या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. तसेच त्यांचे वडील विटा (जिल्हा सांगली) येथे असताना मराठी चौथी आणि इंग्रजी पहिल्या दोन्ही इयत्तेचे शिक्षण भाऊरावांनी विटा शाळेतून घेतले, तर पुढील शिक्षण त्यांना कोल्हापूर येथे घ्यावे लागले. जैन वस्तीगृहात राहण्याची सोय झाल्यावर त्यांनी राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षण घेत इंग्रजी सहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. वास्तविक पाहता त्यांच्या जैन समाजातील पाटील घराण्यात सात पिढ्यांमध्ये कोणी औपचारिक शिक्षण घेतले नव्हते, भाऊराव यांचे वडील पायगोंडा पाटील हे त्यांच्या घरातील पहिले शिक्षित तरुण होते. पायगोंडा यांनी गावात शाळा नसल्याने पायपीट करून आष्टा तालुक्यातील गावी जाऊन शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी ते मराठी इयत्ता सातवी उत्तीर्ण झाले, त्या काळी जैन समाजातील सातवीची परीक्षा उत्तीर्ण होणारा पहिला विद्यार्थी म्हणून पायगोंडा पाटील यांचे खूप कौतुक झाले. पुढे महसूल खात्यात रोड कारकून म्हणून नोकरी लागले. पुढे याच घराण्यात जन्मलेले कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण महर्षी म्हणून प्रसिद्ध पावले.
राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर येथे ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची सोय केली होती. तसेच इ. स. 1905 मध्ये कोल्हापूर येथे शाहू महाराजांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते (आणि नंतरच्या काळात राज्याचे शिक्षण मंत्री झालेले) अण्णासाहेब लठ्ठे यांनी जैन वसतिगृहाची स्थापना केली. या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी भाऊराव दाखल झाले. कोल्हापूरला शिक्षण घेताना इ. स. 1910 मध्ये इंग्रजी सहावीची परीक्षा नापास झाल्यामुळे भाऊरावांनी शाहू महाराजांचा निरोप घेऊन घरी परत जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, त्याचवेळी जैन तीर्थक्षेत्र श्री श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे भगवान गोमटेश्वराच्या भव्य मूर्ती महामस्तकाभिषेक केला जाणार होता, या उत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी कर्मवीर भाऊराव यांनी दाखविली. याच वेळी उत्सव जैन सभेचे अधिवेशन देखील आयोजित करण्यात आले होते. मुंबईचे रत्नपारखी शेठ माणिकचंद पानाचंद हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यावेळी अनेक उपक्रमात उत्साहाने सहभागी असलेल्या भाऊराव यांना माणिकचंद यांनी बघितले, आणि हा मुलगा आपल्या समाजाच्या चांगला कामी येईल म्हणून त्यांनी भाऊरावांना मुंबईत नेले. तेथे त्यांना रत्नाचे प्रकार, आकार, कांती यांचे ज्ञान देण्यात आले. परंतु त्यांना या कामात रस वाटेना, पेटीतील रत्नांचे त्यांना आकर्षण नव्हते, किंबहुना त्यांना शिक्षणातून नररत्न घडवायची होती. त्यामुळे मुंबईतील नोकरी – व्यवसाय सोडून ते पुन्हा कोल्हापुर – सातारा भागात आले.
कर्मवीर भाऊराव यांनी शाळा सोडली तेव्हा त्यांचे वय १८ वर्ष होते. त्या काळात कमी वयात लग्न होत असत. भाऊराव यांचे अठराव्या वर्षी लग्न झाले, कुंभोज येथील पाटलांची मुलगी आदक्का (लक्ष्मीबाई) त्यांच्या सहचारिणी बनली. मात्र आता पुढील संसाराचा गाडा ओढण्याचा प्रश्न निर्माण झाला. सातारा येथे जाऊन मित्रांच्या खोलीवर राहून भाऊरावांनी शिकवण्या सुरू केल्या. इंग्रजी सहावी नापास भाऊराव हे इंग्रजी, गणित आणि संस्कृत विषयाचे गुरुजी झाले. परंतु मुलांना शिकवायचे तर आधी स्वतःलाच माहिती पाहिजे म्हणून भाऊरावांनी इंग्रजी आणि गणिताचा अभ्यास सुरू केला. संस्कृत मात्र त्यांना समजत नव्हते, शेवटी त्यांनी संस्कृतचे गाढे अभ्यासक पंडित गजेंद्रगडकर शास्त्री यांच्याकडे संस्कृती शिकवणी लावली. भल्या पहाटे ते हातात कंदील घेऊन शास्त्री बुवांकडे संस्कृत शिकण्यासाठी जात. त्यानंतर सकाळी सर्व कामे करून दुपारी तसेच रात्री उशिरापर्यंत दिवा किंवा चिमणीच्या उजेडात आपल्या विद्यार्थ्यांना ते इंग्रजी, गणित आणि संस्कृत शिकवत. लोक त्यांना पाटील मास्तर म्हणून ओळखत असत. पोप नावाचे इंग्रज डेप्युटी कलेक्टर यांना पाटील मास्तर संस्कृतचे धडे देऊ लागले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची कौटुंबिक परिस्थिती वडील नोकरीला असेपर्यंत चांगली होती. परंतु नंतर भाऊरावांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला वाहून घेतल्याने कौटुंबिक जबाबदारी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्यावर येऊन पडली. आपला एक मुलगा आणि एक मुलगी यांचा सांभाळ करत असताना त्या वसतीगृहाच्या मुलांचा मोठ्या ममतेने सांभाळ करत असत. त्यांचा मुलगा अप्पासाहेब आणि सून सुशिलाबाई यांनी भाउराव अण्णांच्या कार्याला साथ दिली. तसेच अण्णांची मुलगी शकुंतला हिने विवाहानंतर सोन्याच्या बांगड्या त्यांच्या कार्याला दिल्या. तद्वतच अण्णांच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याला देणग्या दिल्या.
अनेक चढ-उतार अनुभवल्यावर भाऊरावांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी सातारा येथे शिकवण्या घेतल्या होत्या. विमा एजंट म्हणून काम केले होते. परंतु आता ते शक्य नव्हते. उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या शेतीच्या लोखंडी अवजारांच्या कारखान्यात भाऊराव यांनी काम केले. शेतकरी, व्यापाऱ्यांना लोखंडी नांगराची माहिती पटवून देताना ते स्वतः नांगर चालून दाखवत. त्यामुळे किर्लोस्कर यांनी भाऊरावांचा पगार 90 रुपये केला. इ. स. 1938 मध्ये हा पगार म्हणजे आताचा सुमारे 90 हजार रुपये होय. कारण त्या काळात सोने वीस रुपये तोळा आणि ज्वारी दोन रुपये पोते होती. पुढे सर्व आपले पैसे, धनदौलत भाऊरावांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली.
कर्मवीर भाऊराव पाटील हे सत्यशोधक समाज सेवेशी निरंतर जोडले गेले होते. नोकरी सांभाळून ते सत्यशोधक चळवळीच्या सभेमध्ये महात्मा फुले यांचे विचार सांगत. एकदा एक सत्यशोधकी जलसा पुण्याजवळ लोहगाव येथे सुरू असताना ते बघायला राजर्षी शाहू महाराज येणार होते, त्यावेळी ढोलकीवाला नसल्याने भाऊरावांनी स्वतः ढोलकी वाजली. त्यानंतर भाऊरावांनी अनेक वेळा डफावर थाप देऊन समाज सुधारणेचे पोवाडे म्हटले. त्यांचा पहाडी आवाज घुमला की सभा एकदम शांत होई, सत्यशोधक समाजाचे एक प्रभावी वक्ता म्हणून भाऊरावांचा लौकिक वाढला होता. भाऊराव सभेत आपल्या भाषणात समाजातील जातीयता, विषमता यावर प्रहार करीत. तसेच समतेवर आधारित शिक्षण प्रसार करत.
शिक्षण प्रसाराबद्दल इ. स.1919 यावर्षी कराड तालुक्यातील काले या गावी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात शिक्षणाच्या कार्यातही संस्था स्थापन करण्याचा विचार मांडल्यावर याच वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर दि. 4 ऑक्टोबर 1919 या दिनी काले (जि. सातारा) येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. पाच वर्षे या ठिकाणी कार्य केल्यावर या संस्थेचे सातारा येथे स्थलांतर करण्यात आले. याठिकाणी सुरुवातीला जागेची अडचण निर्माण झाली, तेव्हा कर्मवीरांनी सोमवार पेठ येथे आपल्या निवासस्थानी संस्थेचे कार्यालय उघडले. केवळ गरीब मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना या संस्थेचे सुरुवातीचे उद्दिष्ट होते. या ठिकाणी सर्व जातीधर्माचे विद्यार्थी एकत्र राहत होते. या कार्यासाठी त्यांना अनेक थोरामोठ्यांचे सहकार्य लाभले. महात्मा गांधी यांनी इ. स.1927 मध्ये भाऊरावांच्या वस्तीगृहास भेट दिली, तेव्हा त्यांच्या हस्ते वस्तीगृहाचे नामकरण छत्रपती शाहू बोर्डिंग असे करण्यात आले. याठिकाणी सर्व जाती-धर्माची मुले एकत्र राहत, हे बघून महात्मा गांधी यांनी हरीजनसेवक संघातून पाचशे रुपये मासिक अनुदान सुरू केले. महात्मा गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीनिमित्त भाऊराव यांनी महात्मा गांधी यांच्या नावाने 101 हायस्कूल स्थापन केल्या. इतकेच नव्हे तर अनेक शाळा, कॉलेज स्थापन करून रयत शिक्षण संस्थेचा नावलौकीक वाढविला. त्यांच्या या शिक्षण कार्याकरिता सातारच्या महाराजांनी दहा एकर जमिन अल्प भाडे तत्वावर दिली. त्यात दोन विहिरी, नारळीबाग, आमराई, एक मोठी इमारत आणि तीनशे वर्षापूर्वीचा जुना वटवृक्ष होता. हाच वटवृक्ष पुढे कालांतराने संस्थेचे बोधचिन्ह बनला. भाऊरावांच्या शिक्षण कार्याचा अनेक संस्थांनी गौरव केला. पुणे विद्यापीठाने त्यांना मानद डी. लीट. पदवी दिली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तेव्हा भाऊराव म्हणाले की, “डॉक्टर साहेब, मी फार शिकू शकलो नाही, अनेकदा मी नापास झालो, पण समाजातील गोरगरीब मुलांनी शिकावे म्हणून माझी धडपड आहे.” त्यावर डॉ. राधाकृष्णन म्हणाले, “भाऊसाहेब, तेव्हा नापास झालात पण आज हजारो गरीब मुलांना घडवित आहात, देशाला तुमच्या कार्याचा अभिमान वाटतो.”
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)