बेळगाव – कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ बरळले असून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज हे मूळचे कर्नाटकातील आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील असल्याचा दावा कार्जोळ यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
बेळगावसह अन्य सीमावादग्रस्त भाग हा केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मंत्र्यांनी विधान केले होते की, मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश करा. त्यानंतर आता कार्जोळ यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज हे कर्नाटकचे असल्याचे ठासून सांगितले आहे.
महाराष्ट्रातील सरकार हे भेसळीचे आहे. काँग्रेस केव्हाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदावरुन उतरवू शकते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे नागरिकांचे लक्ष वळविण्यासाठी विविध विधाने करीत असल्याचे कार्जोळ म्हणाले.
कार्जोळ यांनी दावा केली की, उद्धव ठाकरे यांना इतिहास माहित नाही. त्यांनी तो वाचलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज हे कर्नाटक मधील गदग जिल्ह्यातील सोरटूर या गावाचे आहेत. त्यांचे मूळ पुरुष हे बेळीअप्पा हे होते. कर्नाटकात दुष्काळ पडल्यानंतर ते महाराष्ट्रात गेले. त्यानंतरच्या पिढीत शिवाजी महाराज जन्माला आले, असे कार्जोळ यांनी ठासून सांगितले आहे.