मुंबई – ‘इंडियन आयडॉल’ हा छोट्या पडद्यावरील रिऍलिटी शो फार लोकप्रिय आहे. येथे येऊन आपली कला दाखवण्यासाठी अनेक जण खूप उत्सुक असतात. यासाठी काय वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. येथे आलेल्या हरहुन्नरी गायक उमेदवारांपैकी एक शहजाद अली. या शोमध्ये येण्यासाठी त्याने पाच हजार रुपयांचे कर्ज काढले आहे.
जयपूर येथील शहजाद अली या शोमध्ये ओळख करून देताना आपल्या खाजगी आयुष्यातील काही गोष्टी सांगतानाचा व्हिडीओ संबंधित वाहिनीने शेअर केला आहे. त्या व्हिडिओनुसार, लहानपणीच आईचे निधन झाल्याने शहजाद आपल्या आजीसोबत (आईच्या आईसोबत) राहतो.
सध्या तो एका कपड्याच्या दुकानात काम करतो. या शो च्या ऑडिशन्सपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या आजीने बँकेतून पाच हजार रुपयांचे कर्ज काढल्याचे शहजादने सांगितले. त्याची ही कहाणी ऐकून या शो ची जज असलेल्या नेहा कक्करचे डोळे भरून आले. आणि तिने शहजादला एक लाखांचा चेक दिला. तर दुसरे जज विशाल दादलानी त्याला चांगला गुरु शोधून देणार असल्याची ग्वाही दिली. २८ नोव्हेंबरपासून हा शो सुरु होणार असून दर शनिवार, रविवार रात्री ८ वाजता तो प्रसारित केला जाईल.