सुरगाणा ः लहरी वातावरणाचा पिकांना बसणारा फटका अन् त्यामुळं कर्जबाजारी होण्याचं प्रमाण वाढल्यानं आपला अन्नदाता आर्थिक विवंचनेतून टोकाचा निर्णय घेऊ लागला आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत होऊ न शकल्यानं सुरगाणा तालुक्यातील वांगण इथल्या शेतक-याने गुरुवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली.
माधव सखाराम टोपले (वय ५२ वांगण) असं शेतक-याचे नाव आहे. कर्जाचे हफ्ते थकल्यानं त्यांना बँकेकडून ३० नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस मिळाली होती. त्यानंतर ते नेहमी मानसिक तणावाखाली होते, असं त्यांचा मुलगा नीलेश यांनी सांगितलं. मुलगा नीलेश यांनी सांगितलं, की ते आई मोहनाबाई, वडील माधव आणि भाऊ प्रकाश यांच्यासोबत वांगण इथं राहतात. त्यांच्या वडिलांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरगाणा शाखेतून ट्रॅक्टर घेण्यासाठी ४ लाख ५० हजार ४६७ रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून शेतीत उत्पादन होत नसल्यानं कर्जाचे हप्ते वेळेवर भरणं शक्य झाले नाही. त्यामुळे वडील नेहमी विचारात आणि दडपणाखाली वावरत असत. ते याबाबतही बोलत असत. भाऊ प्रकाश याचंही लग्न ठरलं असून पैशांची जमवाजमव सुरू होती.
घरी कोणीही नसताना उचचले पाऊल…
गुरुवारी नीलेश कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. भाऊ प्रकाश नोकरीसाठी बाहेरगावी होता. त्यांची आई शेतात गेली होती. घरी कोणीही नसताना माधव टोपले यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विष प्राशन केले. त्यांच्यासमोर विषारी औषधाची बाटली आढळली. नातेवाईकांच्या मदतीनं त्यांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.