थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी ईश्वरचंद्र विद्यासागर यांची आज दि. २६ सप्टेंबर रोजी जयंती, त्यानिमित्त विशेष लेख…
– मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
हा प्रसंग आहे, साधारणतः ९५ वर्षापूर्वीचा अमळनेर येथील छात्रालयातील मुलांना इ. स. १९२५ मध्ये सानेगुरुजी एक गोष्ट सांगत होते, सत्य घटनेवर आधारित असलेली गोष्ट अशी होती… बंगालमधील एका संस्कृत महाविद्यालयाचे एक प्राध्यापक आई आजारी असल्याने गावाकडे जाण्यासाठी निघाले, परंतु महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी रजा नाकारली. या प्राध्यापकांनी विनवणी केली, गावाकडे जाणे आवश्यक होते. परंतु प्राचार्य परवानगी देत नव्हते. त्या प्राध्यापकांनी प्राचार्यांसमोर तात्काळ राजीनामा ठेवला आणि गावाकडची वाट धरली. प्रवासात नदी आडवी आली, दिवस पावसाळ्याचे होते. नदीला महापूर आला होता. त्यामुळे नावाड्याने नदीतून होडी नेण्यास नकार दिला. त्या प्राध्यापकाने महापुरात उडी मारली आणि पलीकडच्या किनारा गाठला. त्यानंतर धावत गावात जाऊन त्यांनी मातेच्या चरणाला स्पर्श केला. मातेने मुलाला जवळ घेतले पुरात ओले कपडे पाहून आईचे काळीज गलबले. आई म्हणाली, बाळा पुरात कशाला उडी मारली. उद्या पूर ओसरल्यावर आला असता तरी चालले असते. त्यावेळी त्या थोर मातेचा तो सुपुत्र म्हणाला, आई नदीच्या पाण्याला सागराची ओढ होती, तशी मला तुझ्या भेटीची ओढ होती. तुझ्या ओढीने मला हत्तीचे बळ मिळाले आणि आता तुझ्या भेटीने जीवनाचे सार्थक झाले. साने गुरुजीच्या मुखातून ही गोष्ट ऐकून मुले हेलावली. कोण होते त्या गोष्टीतील धाडसी मातृभक्त पुत्र… ते होते थोर प्रज्ञावंत ईश्वरचंद्र विद्यासागर आणि हा मातृभक्तीचा प्रसंग घडला होता इ. स. १८४० च्या सुमारास…
ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी दि. २६ सप्टेंबर १८२० रोजी झाला. त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास बंदोपाध्याय तर मातेचे नाव भगवती देवी होते. ईश्वरचंद्र कोलकता येथे संस्कृत कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचे वडील तेथेच एका कार्यालयात कारकून म्हणून दरमहा दहा रुपये पगारावर नोकरी करत होते. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ते एका छोट्याशा खोलीत राहत आणि कधी कधी तर एक वेळ उपाशी देखील राहत असत. त्याच वेळी ईश्वरचंद्र यांनी ठरवले की, खूप शिक्षण घेऊन मोठे व्हायचे आणि आई-वडिलांना सुखी करायचे.
ईश्वरचंद्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षीच हिंदू धर्मशास्त्रातील सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यासागर ही पदवी मिळवली आणि वयाच्या अठराव्या वर्षी ते प्राध्यापक झाले. त्या काळात इतक्या कमी वयात प्राध्यापक होणारे ते पहिले विद्यार्थी होते. मात्र वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक थोरामोठ्याच्या मदतीने शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याच काळात त्यांनी सुमारे ३५ ठिकाणी पालिका विद्यालय सुरू केलीत.
भावी पिढीला चांगले गुरुजन लाभावे म्हणून अध्यापक महाविद्यालय देखील सुरू केले. काही काळ त्यांनी प्राचार्य म्हणून देखील काम केले. त्यानंतर त्यांनी त्यांची सरकारने शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यावेळी त्यांनी बंगाल मधील सर्व प्रमुख शहरात आदर्श (मॉडेल) विद्यालय सुरू केले. मात्र चांगले काम करताना अनेक जाचक अटी आणि शासकीय निर्बंध त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ समाजसेवा सुरू केली.
त्याकाळात बंगालमध्ये विधवा महिलांना खूप जाच सहन करावा लागे. त्याविरुद्ध प्रबोधन करीत ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाला चालना दिली. सामाजिक सुधारणेवर भर देतानाच त्यांनी शिक्षण प्रसाराचे देखील कार्य केले. त्यामुळे त्यांना बंगालचे महर्षी कर्वे असे म्हणत असत. तद्वतच त्यांनी अनेक विषयांवर ग्रंथलेखन करीत साहित्यसेवा केली. त्यात प्रामुख्याने व्याकरण कौमुदी, ऋतूपाठ, उपक्रमाणिका, वर्ण परिचय, कथामाला, शब्द मंजरी, बांगलार इतिहास अशा नानाविध ग्रंथांचा समावेश आहे.
आजही बंगालमध्ये त्यांच्या साहित्याचे घराघरात वाचन केले जाते. राजा राममोहन राय, रामकृष्ण परमहंस हे त्यांचे निकटवर्ती सहकारी होते. तर स्वामी विवेकानंद हे त्यांचे विद्यार्थी होते. तसेच मायकेल मधुसूदन दत्त सारखे अनेक प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. नवभारताच्या प्रबोधन कार्याचा प्रारंभ सर्वप्रथम बंगालमध्ये करणारा हा प्रज्ञासूर्य दि. २९ जुलै १८९१ रोजी संसाररुपी सागरातून अस्ताला गेला.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)